Nashik onion purchase rate
लासलगाव : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून दि. १५ मे पासून केंद्र सरकारमार्फत १२ रुपये ३५ पैसे प्रतिकिलो दराने कांदा खरेदी सुरू करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर अपुरा असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने दिलेला दर हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असल्याची भावना शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडलेले असतानाच राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करीत मोठा दिलासा मिळविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे विनंती केल्यानंतर दि. १५ मे पासून महाराष्ट्रात १२.३५ प्रतिकिलो दराने कांदा खरेदी सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी कांदा फेकून देण्याच्या स्थितीत आले होते. दरम्यान, केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सातारा येथे सांगतानाच ही खरेदी नाफेड, एनसीसीएफमार्फत केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला अत्यल्प भाव मिळत असून, काही ठिकाणी एक रुपयापर्यंत दर खाली आला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. कांदा दर कोसळल्यामुळे विविध शेतकरी संघटनांनी प्रतिक्विंटल १५०० रुपये अनुदान देण्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, लासलगावसह प्रमुख कांदा बाजारपेठांमध्ये दरातील चढ-उतार कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
कांद्याचे दर कोसळणे चिंतेची बाब आहे. निर्यातबंदी नसतानाही आखाती देशांतील परिस्थितीमुळे शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी योग्य तो विचार करण्यात येईल.- राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज्य
बियाणे, औषधे, मजुरी आणि साठवणूक यामुळे खर्च प्रचंड वाढला आहे. अशा वेळी १२ रुपये किलो दर म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाची थट्टा आहे. किमान ३ हजार रुपये प्रतिक्विंटल दर द्यावा.
- शेखर कदम, कांदा उत्पादक शेतकरी, कातरणी, येवला
कांद्याचे दर पाहता उत्पादन खर्चही निघत नाही. केंद्राची घोषणा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी आहे. नाफेडने थेट बाजार समित्यांमधील लिलाव प्रक्रियेत उतरून कांदा खरेदी करावी. त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल.
- खासदार भास्कर भगरे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ
प्रतिकिटल दको कादया दरदीचा घोषणा करण्यात आली होती. मग आज महागाई वाढलेली असताना केवळ १ हजार २३५ दर का दिला जात आहे?
- भारत दिघोळे, अध्यक्ष, कांदा उत्पादक संघटना