SIR voter list pudhari photo
नाशिक

Nashik SIR Voter | नाशिककरांना मोठा दिलासा! एसआयआर सुनावणीसाठी निवडणूक कार्यालयात जाण्याची गरज नाही

Nashik SIR Voter | बीएलओच घरोघरी नोटिसा बजावणार; कागदपत्रेही स्वीकारणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत नोटिसा आणि हरकतींचा टप्पा सुरू असताना मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशानुसार आता नोटीस बजावण्यात आलेल्या मतदारांना सुनावणीसाठी मतदान केंद्र किंवा निवडणूक कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

संबंधित बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) थेट मतदारांच्या घरी जाऊन नोटिसा बजावणार असून, त्याचवेळी आवश्यक मूळ कागदपत्रेही स्वीकारणार आहेत. त्यामुळे मतदारांची धावपळ कमी होणार असली, तरी बीएलओंच्या कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शनिवारी जिल्हा निवडणूक शाखेतर्फे आयोजित विशेष शिबिराला नोटीस बजावण्यात आलेले मतदार तसेच नवमतदारांनी मोठी गर्दी केली होती. पात्र नागरिकांनी मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासह नाव, पत्ता व अन्य तपशीलांतील त्रुटी दुरुस्तीसाठी अर्ज केले. तसेच नाव वगळणे, निवासस्थान बदलणे, ईपीआयसीमध्ये बदल करणे आणि दिव्यांग मतदार म्हणून नोंद करण्यासाठीही अर्ज स्वीकारण्यात आले.

दरम्यान, २००२ च्या एसआयआर यादीत स्वतःचे किंवा पालकांचे नाव आढळून न आलेले तसेच अर्जातील माहितमध्ये त्रुटी आढळलेल्या मतदारांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. या मतदारांची कागदपत्रांच्या आधारे पडताळणी करण्यात येणार आहे.

४६ हजार ४४५ जणांकडून फॉर्म-८:
निवासस्थानातील बदल, मतदारयादीतील नोंदींमध्ये दुरुस्ती, ईपीआयसीमध्ये बदल तसेच दिव्यांग म्हणून नोंद करण्यासाठी आतापर्यंत ४६ हजार ४४५ जणांनी नमुना-८ अर्ज भरले आहेत.

६२ हजार ५१३ नवमतदारांचे अर्ज:
प्रथमच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नवमतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आतापर्यंत सुमारे ६२ हजार ५१३ नवमतदारांनी नमुना-६ अर्ज सादर केले आहेत. यात ऑनलाइन अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT