नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नाशिक महापालिकेच्या अग्निशमन व आपत्कालिन सेवा विभागातील २४६ पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्चाच्या ३५ टक्के मर्यादेची अट शिथिल केली आहे. या पदाच्या भरतीसाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर सध्यास्थितीत ७ हजार ७२५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी तब्बल साडेतीन हजार पदं दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त आहेत. या रिक्तपदांमुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात विपरीत परिणाम होत आहेत. महापालिकेचा दर्जा ब वर्गाचा असला तरी, आस्थापना मात्र क वर्गाची आहे. सन २०१८ मध्ये १४ हजार पदांचा सुधारीत आकृतीबंध महापालिकेने शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला होता. नगरविकास विभागाने त्यावर आक्षेप घेतल्याने तो रखडला होता.
दरम्यान, कोरोना काळात तातडीची बाब म्हणून वैद्यकीय, आरोग्य तसेच अग्निशमन विभागातील ७०६ पदांच्या भरतीला शासनाने मंजुरी दिली होती. यासाठी टीसीएस कंपनीसोबत करारही करण्यात आला होता. परंतू या भरतीसाठी डिसेंबरची मुदत उलटल्याने भरती प्रक्रिया रखडली. त्यात आस्थापना खर्च शिथील करण्याबाबतची वेळही निघून गेल्याने ही भरतीही डब्यात गेली. दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता महापालिकेतील अपुरे मनुष्यबळ अडचणीचे ठरणार आहे. आपत्ती नियोजनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेच्या प्रस्तावानुसार आस्थापना खर्चाची अट शिथिल करत अग्निशमन व आपत्कालिन सेवा विभागातील २४६ पदांच्या भरतीचा मार्ग शासनाने खुला केला आहे. यासंदर्भातील शासनाच्या नगरविकास विभागाचे उपसचिव अजिंक्य बगाडे यांच्या स्वाक्षरीचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे.
अग्निशमन विभागातील या पदांची होणार भरती
स्टेशन आॉफिसर - ३
सब आॉफिसर - ९
चालक/यंत्रचालक - ३६
फायरमन - १९८
एकूण - २४६
उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याची अट
शासनाने महापालिकेच्या अग्निशमन विभागातील या नोकरभरतीला सशर्थ परवानगी दिली आहे. त्यानुसार महापालिकेला उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.तसेच शासनाने निश्चित केलेल्या अर्हता निकषांचे तसेच विहित कार्यपध्दतीचे काटेकोरपणे पालन करूनच ही नोकरभरती करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. याचबरोबर आस्थापना खर्च मर्यादेत राहावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना देखील कराव्या लागणार आहेत.