नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी ऐतिहासिक विजय मिळवताच, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गुलालाच्या उधळणीने आणि घोषणाबाजीने न्हाऊन निघाला. 'गोकुळ गिते तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी गितेंना खांद्यावर उचलून घेतले आणि प्रवेशद्वारापर्यंत त्यांची जंगी मिरवणूक काढली.
विजय निश्चित होताच कुटुंबीयांनी गितेंना पेढे भरवून त्यांचे अभिनंदन केले. सोमवारी (दि. २२) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दगडी इमारतीत कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत मतपेट्या उघडण्यात आल्या.
सकाळी पहिल्या फेरीतील १२० मतांपैकी ९० हून अधिक मते गोकुळ गितेंच्या पारड्यात पडल्याचे स्पष्ट होताच, गितेंच्या प्रतिनिधीने ही बातमी बाहेर थांबलेल्या समर्थकांना दिली. हा कल पाहताच महायुतीचे उमेदवार दराडे यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. गिते विजयी झाल्याचा निरोप त्याने प्रवेशद्वारावर थांबलेल्या समर्थकांपर्यंत पोहोचवला. त्यावेळी समर्थकांनी एकच जल्लोष सुरू केला.
पहिल्याच फेरीत गितेंनी विजयाचा कोटा पूर्ण केल्यामुळे दुसरी फेरी घेण्याची गरज नसल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केले. यानंतर गितेंच्या पत्नी उज्ज्वला गिते आणि मोठे बंधू गणेश गिते मतमोजणी केंद्रात दाखल झाले व त्यांनी विजयाचे अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारले.
जोरदार घोषणाबाजी
विजयाची अधिकृत घोषणा होताच गितेंच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. संपूर्ण परिसर गुलालमय झाला होता. गितेंच्या पत्नी उज्ज्वला गिते आणि बंधू गणेश गिते यांच्या उपस्थितीत विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर कार्यकर्त्यांनी गितेंना पुष्पहार घालून खांद्यावर उचलले. पोलिस बंदोबस्त असतानाही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
दराडे बंधूंचा राग अनावर
मतमोजणी केंद्रावर गोकुळ गिते यांचा विजय निश्चित झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे लागलीच मतमोजणी केंद्राबाहेर पडले. या पाठोपाठ त्यांचे बंधू आमदार किशोर दराडे हेदेखील बाहेर पडले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दराडे बंधूंची वाहने पोहोचल्यावर गिते समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी आमदार दराडे यांनी वाहन थांबवत, वाहनाबाहेर आले आणि कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले. त्यावेळी कार्यकर्ते बाजूला झाले अन् दराडेंची वाहने निघून गेली.