Nashik MLC Election Result 2026 
नाशिक

Nashik MLC Election Result 2026 | नाशिकमध्ये महायुतीला धक्का

Nashik MLC Election Result 2026 | राज्यात 'ऑपरेशन टायगर' यशस्वीपणे राबविणारी शिवसेना (शिंदे) नाशिकमध्ये 'ऑपरेशन गिते'मध्ये मात्र सपशेल अपयशी ठरली.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यात 'ऑपरेशन टायगर' यशस्वीपणे राबविणारी शिवसेना (शिंदे) नाशिकमध्ये 'ऑपरेशन गिते'मध्ये मात्र सपशेल अपयशी ठरली. बंडखोरी, नाराजी आणि घटक पक्षांमधील चढाओढीच्या राजकारणातून अत्यंत चुरशीच्या झालेल्या विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत राज्यातील सत्तारूढ महायुतीला मोठा धक्का बसला असून, भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांची सरशी झाली.

बहुमत असूनही महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना तब्बल १०९ मतांनी दारुण पराभव पत्करावा लागल्यामुळे महायुतीची मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. गोकुळ गिते यांना ३५७ मते मिळाली असून, नरेंद्र दराडे यांना २४८ मतांवर समाधान मानावे लागले, तर प्रसाद हिरे यांना एकही मत मिळाले नाही. विधान परिषद निवडणुकीसाठी नाशिकची जागा महायुतीत शिवसेनेला सुटल्यापासूनच महायुतीतील नाराजी नाट्याला सुरुवात झाली होती.

खरे तर ही जागा मिळावी, यासाठी भाजपचे प्रयत्न होते. या जागेसाठी स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते हे भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. भाजपचे संकटमोचक समजल्या जाणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांना गणेश गिते यांच्या अर्ज माघारीत मुदतीत यश आले. मात्र गोकुळ गिते, प्रसाद हिरे हे निवडणूक लढविण्यावर ठाम राहिल्यामुळे त्यांचा अर्ज निवडणूक रिंगणात कायम होता.

मंत्री महाजनांसह शिवसेनेचे मंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत व शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये तळ ठोकत सुरुवातीला प्रसाद हिरे यांच्या माधारीत यश मिळविले. महाजन, सामंतांसह थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे गिते यांनी प्रचार थांबविल्याचे जाहीर केले; पण त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली नव्हती, हे या निवडणुकीच्या निकालातून अखेर स्पष्ट झाले. या निवडणुकीसाठी दि. १८ जून रोजी मतदान झाले. एकूण ६१२ पैकी ६१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर सोमवारी (दि.२२) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणी झाली.

मतमोजणीसाठी एकूण चार टेबल लावले होते. एकूण ६१८ पैकी १३ मते अवैध ठरली. त्यामुळे विजयी मांचा कोटा ३०३ एवढा निश्चित करण्यात आला. गिते यांनी पहिल्या फेरीतच विजयी मांसाठी आवश्यक ३०३ मतांचा कोटा पूर्ण केल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्य गिते यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मतमोजणीवेळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोलिस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता. विजयाची घोषणा होताक्षणी गिते समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी अन् गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT