नाशिक : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थी (अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब) यांना अन्नधान्य (शिधा) वितरीत करणाऱ्या रास्त भाव दुकानधारकांच्या मार्जिन रकमेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. मात्र, ही वाढ मागणीपेक्षा कमी असल्यामुळे दुकानदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनवाढीच्या मागणीवर मंत्रिमंडळाने सकारात्मक भूमिका घेतली असून, त्यांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिधापत्रिकाधारकांना ई- पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरणासाठी रास्त भाव दुकानदारांना प्रतिक्विंटल मार्जिन दरामध्ये 20 रुपये वाढ करून ते 170 रुपये करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजित वार्षिक 92.71 कोटी इतका अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
दरम्यान, रेशन दुकानदार संघटनेकडून मार्जिनमध्ये ५० रुपये वाढ करण्याची मागणी होती. मात्र सरकारने केवळ 20 रुपये वाढ केल्यामुळे दुकानदारांची नाराजी कायम आहे.
रेशन दुकानदारांना प्रतिक्विंटल 150 रुपये मिळणारे मार्जिन 200 रुपये करावे, अशी मागणी आम्ही शासनाकडे केली होती. मात्र शासनाने केवळ 20 रुपयांची वाढ केली. महामाईचा विचार करता ही वाढ तुटपुंजी आहे.निवृत्ती कापसे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा रास्त भाव