

नाशिक : ज्या शिधापत्रिकाधारकांनी मागील सहा महिन्यांत धान्याची उचल केलेली नाही, अशा लाभार्थींचे धान्य शासन आदेशाने बंद करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा पुरवठा विभागाने पडताळणी सुरू केली असून, १२ हजार ६५३ शिधापत्रिकांवरील ३३ हजार ९५९ लाभार्थींनी सहा महिन्यांपासून धान्याची उचल केलेली नाही. एकूणच खातरजमा झाल्यानंतर संबंधितांचा स्वस्त धान्यपुरवठा बंद केला जाणार आहे.
अनेक वेळा असे आढळले आहे की, अनेक शिधापत्रिकाधारक दर महिन्याला मिळणारे धान्य उचलत नाहीत, त्यामुळे या शिल्लक धान्याचा हिशेब लावताना शासनाची दमछाक होते. नाशिक जिल्ह्यातील अशा ३३ हजार ९५९ लाभार्थींचे धान्य बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या प्रत्येक स्वस्त धान्य दुकान स्तरावर लाभार्थींची पडताळणी सुरू करण्यात आली असून, काम पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. याशिवाय ज्यांच्या दारापुढे कार आहे अथवा कुटुंबातील एखादी व्यक्ती आयकर भरत असेल अशा लाभार्थींची माहिती संकलित करीत त्यांचेही धान्य बंद करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया केंद्रीय स्तरावरून सुरू झाली आहे.
सरकारकडून नाशिक जिल्ह्यातील सुमारे ३४ हजार लाभार्थींनी सहा महिन्यांपासून धान्याची उचल केलेली नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार, या 12 हजार 653 शिधापत्रिकांची स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत लाभार्थींची पडताळणी करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 20 हजार लाभार्थींची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
रेशन दुकानदारांमार्फत मागील सहा महिन्यांपासून धान्याची उचल न करणार्यांची पडताळणी सुरू केली आहे. अंतिम अहवाल आल्यानंतर धान्य उचलणाऱ्या लाभार्थींचे धान्य वितरण थांबविण्यात येणार आहे.
कैलास पवार, धान्य वितरण अधिकारी, नाशिक.
जिल्हा पुरवठा विभागाने मोफत धान्य योजनेतील अपात्र लाभार्थींची शोधमोहीम हाती घेतली आहे. चारचाकी वाहनधारक, आयकर भरणारे व वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांहून अधिक असणारे शिधापत्रिकाधारकही स्वस्त धान्याचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पॅनकार्ड, आधारकार्ड व बँक स्टेटमेंटच्या आधारे अशांची यादी तयार करून त्यांना योजनेतून अपात्र ठरविण्यात येणार आहे.