जुने नाशिक :रमजान महिन्यात नाशिक शहरात उत्साह, श्रद्धा आणि चविष्ट पदार्थांची मेजवानी यांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळत आहे. संध्याकाळ होताच जुन्या नाशकातील दूधबाजार ते सारडा सर्कलदरम्यानची खाऊगल्ली जिभेचे लाड पुरविणाऱ्यांच्या गर्दीचे केंद्र बनली आहे. बाजारपेठेत खाद्यपदार्थ खरेदीसाठी उसळलेली गर्दी लक्षवेधी ठरत आहे.
यंदा दूधबाजार चौक, मंडई परिसर, बागवानपुरा, मुलतानपुरा, तसेच वडाळा रोड परिसर खवय्यांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरत आहेत. विशेषतः वडाळा रोड भाग सध्या खाऊगल्ली म्हणून ओळखला जाऊ लागला असून, येथे संध्याकाळनंतर मोठ्या प्रमाणावर खाद्यप्रेमींची गर्दी उसळते.
बाजारात विविध चविष्ट पदार्थांची रेलचेल आहे. चटणी कबाब, शाही रोल, पालक क्रिस्पी, कटलेट, चिकन स्वाते, सिख कबाब, मेओनीस रोल, खिमा, पुलाव, बिर्याणी, अक्रोड कबाब, नल्ला निहारी, भुना, खिचडा यांसारखे मांसाहारी पदार्थ खवय्यांची पहिली पसंती ठरत आहेत. आचारी तंदूरमधील गरमागरम नान आणि रोटीलाही मोठी मागणी आहे.
त्याचबरोबर रगडा पॅटीस, दहीवडा, आलू टिक्की, खमंग ढोकळा, मुंबई स्टाइल पालक भजीया यांसारख्या शाकाहारी पदार्थांचा सुगंध सर्वत्र दरवळत आहे. इफ्तारनंतर कुटुंबासह बाहेर पडून बाजारात फेरफटका मारत गरमागरम पदार्थांचा आस्वाद घेण्याचा ट्रेंड वाढताना दिसतो. दुपारी 3 पासूनच स्टॉल्सवर तयारीला सुरुवात होते आणि रात्री उशिरापर्यंत विक्री सुरू असते.
रोजा सोडल्यानंतर अनेक जण थेट बाजारात जाऊन हॉटेल किंवा स्टॉलवरच जेवणाचा आनंद घेतात. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साह, आनंद आणि खाद्यसुगंधाची बहार अनुभवायला मिळत आहे. रमजान बाजार हा केवळ उपवासापुरता मर्यादित न राहता सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मीय नागरिकांच्या सहभागामुळे एक उत्सवमय खाद्यसंस्कृतीचा सोहळा ठरत आहे.
यंदा नाशिकमध्ये अक्षरशः खाण्याची जत्रा भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, जेवणाचा आनंद घेत असताना गोरगरिबांचाही विचार करावा, अन्नदान करावे, जेणेकरून त्यांचाही रमजान आनंदमय जाईल.
फालुद्याची लज्जत न्यारी!
जेवणानंतर फालुद्याचीही मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. मस्तानी फालुदा, मँगो फालुदा, ड्रायफ्रूट फालुदा, केसर फालुदा आणि माहीम फालुदा, रबडी फालुदा अशा विविध प्रकारांचा खवय्ये मनसोक्त आनंद घेत आहेत. दुनिया की सब नेअमतें जणू नाशिकमध्येच उतरल्या आहेत, अशी प्रतिक्रिया अनेक खाद्यप्रेमी व्यक्त करत आहेत.
चटणी कबाब, शाही रोल, पालक क्रिस्पी, कटलेट, चिकन स्वाते, सिख कबाब, मेओनीस रोल, खिमा, पुलाव, बिर्याणी, अक्रोड कबाब, नल्ला निहारी, भुना, खिचडा यांसारखे मांसाहारी पदार्थ खवय्यांची पहिली पसंती ठरत आहेत. आचारी तंदूरमधील गरमागरम नान आणि रोटीलाही मोठी मागणी आहे. त्याचबरोबर रगडा पॅटीस, दहीवडा, आलू टिक्की, खमंग ढोकळा, मुंबई स्टाइल पालक भजीया यांसारख्या शाकाहारी पदार्थांचा सुगंध दरवळत आहे.