ठळक मुद्दे
यंदा राख्यांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ
बाजारात नव्या ट्रेंड्सच्या राख्या
सराफांकडील सुवर्ण रंगाच्या राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
जानोरी (नाशिक) : भावा-बहिणीच्या अतूट बंधनाचा दिवस म्हणजे रक्षाबंधन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत. स्थानिक बाजारपेठांबरोबरच तरुणाईची पसंती असलेली ऑनलाइन बाजारपेठही रक्षाबंधनासाठी नव्या ट्रेंड्सच्या राख्यांनी सज्ज आहे. यंदा राख्यांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाली असून तरुणाईसाठी सध्या स्टाइल, फॅशन महत्त्वाची असल्याने त्याप्रमाणेच राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
टिकाऊ आणि स्वदेशी बनावटीच्या राख्या १० रुपयांपासून ३०० रुपयांदरम्यान उपलब्ध आहेत. सोने आणि चांदीचा मुलामा असलेल्या राख्यांनाही मागील काही वर्षांपासून मागणी वाढली आहे. यंदा सगळ्यात जास्त धाग्यात गुंफलेल्या राख्यांचा बोलबाला आहे. ॲक्रेलिक आणि लायटिंग या दोन प्रकारांतही राख्या उपलब्ध आहेत. ॲक्रेलिकला सोनेरी रंग असणारी आणि राखीवर कोरलेल्या शब्दाने त्याचे व्यक्तिमत्त्व सांगणारी 'सोन्याची राखी' बाजारात मोठ्या प्रमाणात दिसत आहे. ऑनलाइन बाजारपेठ अर्थात अँमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा तत्सम साइटवरही विविध प्रकारच्या राख्या खरेदी करता येणार आहे.
दरम्यान, आजची नवी पिढी गोंडे खरेदी करीत नाहीत. मात्र जुन्या पिढीकडून गोंड्याच्या राख्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. सध्या गोंड्यामध्येही विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध असून त्यांनाही नव्या पिढीकडून चांगली मागणी आहे.
रक्षाबंधनाचा पवित्र सण शनिवारी (दि.९) साजरा होणार असला तरीही राख्या आतापासूनच आप्तांना पाठविण्यास सुरूवात झाली आहे. बाजारामध्ये बच्चेकंपनीसाठी मोटू पतलू, टारझन, स्पायडरमॅन, तर युवकांसाठी जरीची, चंदनाची, मोती आणि नाण्याची राखी या नवीन प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. विविध नक्षीकाम केलेल्या राख्या आणि जरीच्या राख्या दिल्ली, मुंबई येथून मागवल्या जातात. या राख्या ग्राहकांचे खास आकर्षण आहे. या राख्यांची किंमत नक्षीकामानुसार आहे. सराफांकडे चांदीच्या आणि सोन्याचा मुलामा असलेल्या राख्यांवर रुद्राक्ष, विविध रंगाचे खडे, तसेच गणेश, लक्ष्मीदेवतेचे फोटो आहेत. सुवर्ण रंगामुळे या राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. राख्या अनेक राज्यांमध्ये कुरिअरने, रेल्वेने आणि पोस्टानेसुद्धा पाठवल्या जातात. पुढील काही दिवसांत राख्यांना आणखी मागणी वाढणार असल्याची माहिती दिंडोरीतील स्थानिक होलसेल विक्रेत्यांनी दिली.