

सोमाटणे: बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणाला बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते व या राखीच्या बदल्यात भावाने जन्मभर बहिणीचे रक्षण करावे, असे या सणाचे महात्म्य आहे. यंदा 9 ऑगस्ट रोजी साजरा होणार्या या सणासाठी सोमाटणे येथील बाजारपेठा सजल्या आहेत.
विविध आकार, डिझाईन, रंग, थीम वापरून बनवलेल्या राख्या बहिणींना भुरळ घालत आहेत. लहान बहीण भावासाठी खास कार्टून थीम वापरून बनवलेल्या छोटा भीम, बाळ गणेश, डोरेमॉन, मोटू पतलू, श्रीकृष्ण या सारख्या राख्या तसेच मोठ्या बहीण भावांसाठी रुद्राक्ष, क्रिस्टल मॅग्नेट वापरून बनवलेली राखी तसेच खास भावाच्या नावाने बनवलेल्या राख्या बहिणींना भुरळ घालत आहेत. (Latest Pimpri News)
राखी खरेदी करण्यासाठी बहिणींची बाजारपेठेत गर्दी आहे. मात्र, आपल्या लाडक्या बहिणीला रक्षाबंधन निमित्त भेटवस्तू खरेदी करण्यासाठी साड्यांची, भांड्यांची, सोनाराची दुकाने गिफ्ट शॉपी अशा ठिकाणी भाऊरायांची गर्दीसुद्धा पाहायला मिळतेय.
वाढत्या महागाईमुळे राख्यांच्या किमतीत वाढ झाली असली तरी महिला वर्गाचा राख्या खरेदी करण्यासाठीचा उत्साह दांडगा आहे. सोने चांदीच्या भावात वाढ झाली असली तरीही काही बहिणींनी आपल्या भावासाठी खास चांदीच्या राख्या खरेदी केल्या आहेत.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवर मोठ्या प्रमाणात राख्या खरेदी केल्याच पाहायला मिळतंय. तर परदेशात राहणार्या भावा-बहिणींसाठी अनेक अॅपमार्फत ऑनलाइन राखी व भेटवस्तूंचे बुकिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
हिंदू संस्कृतीत श्रावण महिन्यात अनेक सण साजरे केले जातात व यातच बहीण भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन हा सण लहान थोर सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यामुळे बहीण भावांकडून राख्या व भेटवस्तू खरेदीला उधाण आले आहे.