Raju Shetty on Adv. Manikrao Kokate  Pudhari News Network
नाशिक

Raju Shetty on Adv. Manikrao Kokate | पहिले दोषी अजित पवार

Nashik News । 'ओसाड गावची पाटीलकी'वरून राजू शेट्टींचा पवार, कोकाटेंवर हल्लाबोल

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी बेजबाबदार वक्तव्य बंद केलेले नाही. पंचनामा कसला करावा? असे प्रश्न ते विचारत आहेत. आधी शेतकऱ्यांची तुलना भिकारीशी केली, आता कृषिमंत्री पद ओसाड गावची पाटीलकी असल्याचे ते म्हणतात. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यावर मनातले बोलायचे नसते असे सांगतात. त्यामुळे पवारांच्या मनात तेच आहे. त्यामुळे याचे पहिले दोषी पवार असल्याचा हल्लाबोल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला. पवार यांनी शेतीला मोठे बजेट देऊन 'ओसाड गावच्या पाटीलकी'चे नंदनवन करावे अशी मागणी त्यांनी केली.

येथील शासकीय विश्रामगृहात माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी (दि. 3) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी कृषिमंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच अन् मला हे खाते दिले आहे असे वक्तव्य करणाऱ्या मंत्री कोकाटे यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. शेट्टी म्हणाले की, दि. 6 मे पासून सातत्याने तीन आठवडे पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: नाशिक जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. अवकाळीने द्राक्षाची गर्भधारणा होणे अशक्य आहे. डाळिंबाबाबतही तसेच आहे. चाळीतील कांदा खराब झाला आहे, तर शेतातील कांदा वाहून गेला. भाजीपाल्याचीही तीच अवस्था आहे. यात, मंत्री कोकाटे बेजबाबदारपणे वक्तव्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेबाबत विचारले असता शेट्टी यांनी, राज्यातील सर्व नेत्यांना हात जोडून विनंती आहे. एकत्र राहा, अजून फुटा, काहीपण करा. पण, राज्याचे वाटोळे अजून करू नका, असे त्यांनी सुनावले. स्वाभिमानी संघटना स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढणार आहे. जिथे कार्यकर्ता मागणी करेल, तिथे निवडणूक लढविणार आहोत. आघाडीसोबत जायचे का? हे अद्याप ठरलेले नसल्याचे शेट्टी यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप उपस्थित होते.

Nashik Latest News

पंतप्रधानांनी परदेशवाऱ्यांतून काय मिळविले?

जून महिन्याच्या अखेर होणाऱ्या जी- 7 शिखर संमेलनाचे आमंत्रण भारताला अद्यापपर्यंत मिळालेले नसल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात शेट्टी यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरवेळी अनेक देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. भारताला कमी देशांनी पाठिंबा दिला. हे आपल्या परराष्ट्र नीतीचे अपयश आहे, नीती चुकली आहे. आपण एकटे पडत चाललो आहोत. 11 वर्षे मोदींनी परदेशात फिरून केले काय? असा सवाल उपस्थित होत आहे. अमेरिकेची सर्वात मोठी बाजारपेठ चीन होती. मात्र, दोन्ही देशांत वाद सुरू आहेत. त्याचा फायदा आपल्या देशाला घेता आला नाही. आपल्याकडे जे आहे त्याचा फायदा घ्या. उद्योगपतीचा नाद सोडून शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा दिल्या असत्या, तर वेगळी परिस्थिती राहिली असती, असे सांगत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

राजकारणाचा दर्जा रसातळाला

शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना शेट्टी म्हणाले की, राज्यात राजकारणाचा दर्जा रसातळाला गेला आहे. आधीही पक्षांतरे झाली पण, आता भीती घातली जाते आणि पक्षांतर केले जात आहे. यामुळे कार्यकर्ते खेचले जात आहेत. हे आता बाहेर येत आहे. लोकांना कळू द्या कोण काय लायकीचे आहेत, अशीही टीका त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT