नाशिक : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात दाखल झालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी झालेली पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी.  (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Raj Thackeray News | अवघ्या तीन तासात गुंडाळला ‘राज’ दौरा

पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मुंबईला रवाना; मनसैनिकांमध्ये संभ्रम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी व्यूहरचना आखण्याकरिता नाशिकच्या दोनदिवसीय दौऱ्यावर आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवघ्या तीन तासातच दौरा गुंडाळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नियोजित वेळेच्या तब्बल दोन तास उशिरा आलेल्या राज ठाकरे यांनी एका हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांची तासभर बैठक घेत ते मुंबईकडे रवाना झाले. त्यामुळे मनसैनिकांची घोर निराशा झाली आहे.

२०१२ च्या निवडणुकीत सर्वाधिक ४० नगरसेवक निवडून आणत महापालिकेची सत्ता काबीज करणाऱ्या आणि नाशिकमधील तीनही आमदारपदे मिळवत राज्याच्या राजकारणात दबावगट निर्माण केलेल्या मनसेची नंतरच्या काळात वाताहात झाली. पक्षाला भरभक्कम स्थानिक नेतृत्व न लाभल्यामुळे पिछेहाट होत गेली. २०१७ च्या निवडणुकीत जेमतेम पाच नगरसेवक निवडून येऊ शकले. त्यानंतरही पक्षाची ही पडझड कायम राहिली. पक्ष स्थापनेपासून असलेल्या जुन्या जाणत्यांमध्ये अवघे बोटावर मोजणे इतके लोक आता ‘मनसे’त उरलेत. यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मनसेची धरसोड वृत्ती कारणीभूत असली, तरी आगामी महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर येत असलेले ठाकरे मनसैनिकांना नवी उभारी देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. सोमवारी (दि. 26) सकाळी 9 वाजता ते शहरातील एका हॉटेलमध्ये येणार असल्याचा निरोप मिळाल्याने मनसैनिकांनी हॉटेलसमोर गर्दी केली होती. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख काय मंत्र देतात याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले होते. प्रत्यक्षात त्यांचे आगमन 11.१5 च्या सुमारास झाले. उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केल्यानंतर राज यांनी निवडक पदाधिकाऱ्यांची तासभर बैठक घेतली. ते मनसेच्या ‘राजगड’ कार्यालयातही गेले नाहीत. बैठकीनंतर लगेचच ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

निवडणुकीसाठी सज्ज राहा!

ठाकरे यांनी जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, ज्येष्ठ पदाधिकारी सलीम शेख यांच्यासह निवडक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सज्ज राहा, असा संदेश त्यांनी या बैठकीत दिला. पदाधिकाऱ्यांच्या कामांचे मूल्यमापन पक्ष निरीक्षकांकडून केले जाईल. प्रत्येक पदाधिकाऱ्याला कामाची जबाबदारी दिली जाईल, असे ठाकरे यांनी सांगितल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

मला टोपी घालतो का?

स्वागतप्रसंगी फोटोसेशनदेखील झाले. त्यादरम्यान, एका कार्यकत्याने ठाकरे यांना टोपी घालण्याचा प्रयत्न केला. यावर राज यांनी त्या कार्यकर्त्याला उद्देशून, ‘काय रे मला टोपी घालतो का?’, असा मिश्कील प्रश्न केला. त्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.

उद्धव ठाकरेंशी युतीवर भाष्य टाळले

राज यांच्या आवाहनाला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार, या चर्चेने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांना एका मनसैनिकाने धाडस करून विचारले असता, त्यावर अधिक भाष्य करणे त्यांनी टाळले. योग्य वेळी योग्य ती भूमिका कार्यकर्त्यांना कळविली जाईल. पक्षहितासाठी जो निर्णय योग्य असेल, तो घेतला जाईल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT