Raj Thackeray Pudhari
नाशिक

Raj Thackeray | 'एसआयआर'वर करडी नजर ठेवा

Raj Thackeray | पश्चिम बंगालमधील एक कोटी नावे यादीतून गायब झाल्याचा दावा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात सुरू असलेल्या मतदार-यादीच्या सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत विरोधकांची जवळपास ८० लाख नावे मतदार-यादीतून वगळण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करत या मतदारयादी पुनरीक्षण प्रक्रियेवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले.

पश्चिम बंगालमधील एक कोटी नावे मतदार-यादीतून गायब झाल्याचा दावा करताना महाराष्ट्रात त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मनसेचे अधिकाधिक बूथ लेव्हल एजंट (बीएलए) नियुक्त करावेत, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी गुरुवारी नाशिकमध्ये दिल्या.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नामुळे राजकीय वातावरण तापले असताना राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर दाखल झाले.


मुंबई नाका येथे मनसैनिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात शहर व ग्रामीणमधील शाखाध्यक्ष, १५ तालुक्यातील पदाधिकारी आणि पक्षाच्या बीएलएसोबत त्यांनी बैठका घेतल्या. यावेळी निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेचा आढावा घेताना ठाकरे यांनी मतदारयादीतील नावांची पडताळणी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.

मतदार अजूनही पुरेसे जागरूक नसल्याने मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नावे गायब होण्याची शक्यता असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याचा दावा करत, त्याच धर्तीवर राज्यातही विरोधकांच्या लाखो मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा आरोप त्यांनी बैठकीत केला.

मतदारयादीतून नावे कशी वगळली जातात, याची उदाहरणे देत प्रत्येक मतदान केंद्रावरील यादीवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राज ठाकरे नाशिकमधील खड्ड्यांबाबत काय भूमिका घेतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. रस्ते खोदून ठेवल्याने नाशिककरांना चालणे आणि वाहन चालवणे अक्षरशः मुश्कील झाले आहे.

नाशिकच्या प्रश्नांची उजळणी

शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर पक्षाने आक्रमक भूमिका घ्यावी, असे निर्देशही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे, रस्त्यांची अवस्था, पावसाळ्यात वाढलेले खड्डे तसेच त्यातून होणारे अपघात व मृत्यू याबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या विषयांवर शुक्रवारी (दि. ७) पत्रकार परिषदेत ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे.

तरुणांचा मोठा प्रतिसाद

एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या दौऱ्याला यावेळी तरुणांनी मोठी उपस्थिती लावली. विशेषतः 'जेन-झी' पिढीतील युवकांचा सहभाग लक्षणीय होता. त्यामुळे शहरातील तरुणांमध्ये ठाकरे यांची लोकप्रियता कायम असल्याची चर्चा बैठकीच्या ठिकाणी रंगली. याचवेळी शहरातील रिक्षाचालकांनीही ठाकरे यांची भेट घेऊन राज्याच्या बाइक टॅक्सी धोरणाला विरोध करण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT