गंगापूर धरण दुथडी भरुन वाहत असल्याने यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा गोदावरीला पूर आला आहे.  (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

पाऊस खबरबात ! जिल्ह्यात संततधार सुरुच; यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा गोदावरीला पूर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्याला शनिवारी (दि. २४) संततधारेने झोडपून काढले. सर्वदूर हजेरी लावणाऱ्या पावसाने जनता सुखावली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार सरी बरसत असल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. गंगापूर धरण ९३ टक्के भरल्याने धरणातून ८४२८ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा गोदावरीला पूर आला आहे. दारणासह अन्य धरणांमधील विसर्गामुळे नद्या-नाले दुथडी वाहत आहेत. सुरगाण्यातील मौजे शिंदे येथे किसन पिठे (65) हे नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, हवामान विभागाने नाशिकला मंगळवारपर्यंत (दि.२७) आॅरेंज अलर्ट दिला आहे.

  • नाशिक शहरात २२.५ मिमी पर्जन्याची नोंद

  • शनिवार (दि.24) सायंकाळी ६ ला गोदाघाटावर दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी

  • दारणा धरणातून ७५२४ क्यूसेक विसर्ग

  • नांदूरमध्यमेश्वरच्या विसर्गात १५७७५ क्यूसेकपर्यंत वाढ

  • दिंडोरी तालुक्यात नद्या-नाल्यांना पूरपरिस्थिती

चार दिवसांपासून नाशिकमध्ये मुक्काम ठाेकणाऱ्या पावसाचा जोर वाढला आहे. शहर व परिसरात पहाटेपासून जोरदार सरींना सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाचा वेग कायम होता. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहत होते. तर सखल भागांत साचलेल्या पाण्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे नाशिककरांच्या कोंडीत अधिक भर पडली. दरम्यान, गंगापूर धरणातून सकाळी १०५९ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्या नंतर टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करताना सायंकाळी तो ८४२८ क्यूसेकवर नेण्यात आला. त्याचवेळी गौतमी-गोदावरीमधूनही १५३६ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. काठावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोदावरीची पाणीपातळी वाढत असल्याने दुपारपासून महापालिका प्रशासनाने गोदाघाटावर सूचना देण्यास सुरुवात केली.

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यातही पावसाचा जोर कायम आहे. भातशेतीसाठी हा पाऊस फायदेशीर असल्याने बळीराजा सुखावला आहे. इगतपुरी तालुक्यात दारणासह अन्या धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने विसर्गात वाढ केली गेली आहे. त्यामुळे नद्यांना पूर आले आहेत. याशिवाय दिंडोरी, मालेगाव, पेठ व सुरगाणा या तालुक्यांत जोरदार सरी बरसत असल्याने नद्या-नाले दुथडी वाहू लागले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. इतर तालुक्यातही अधुनमधून हलक्या ते मध्यमसरींनी हजेरी लावल्याने सामान्य जनतेसह बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात शनिवारी (दि.२४) सकाळी ८ पर्यंत सरासरी २० मिमी पर्जन्याची नोंद करण्यात आली. यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरी ६२८ मिमी पर्जन्य झाले असून, हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ६८ टक्के आहे.

तीन दिवस सतर्क राहावे

जिल्ह्यात येत्या मंगळवारपर्यंत पावसाचा आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे. घाटमाथ्यासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. पावसाचा जोर बघता विविध धरणांच्या विसर्गात वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे जिल्हावासीयांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT