नाशिक : जिल्ह्याला शनिवारी (दि.३) सर्वदूर पावसाने झोडपून काढले. नाशिक शहर व परिसरात दिवसभर जोरदार सरी बरसल्या. शहरातील पाणी गोदावरी नदीत जाऊन मिसळल्याने यंंदाच्या हंगामात पहिल्यांदा गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही दमदार सरी बरसत आहेत. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा साठा ७२ टक्यांवर पोहचल्याने त्यातून कोणत्या ही क्षणी विसर्ग सुरू केला जाऊ शकतो. (Heavy rains are also lashing the rural areas of the district.)
जुलै एन्डींगला दडी मारुन बसलेल्या पावसाने कमबँक केले आहे. शुक्रवारी (दि.२) मध्यरात्रीपासून नाशिकमध्ये पावसाने हजेरी दिवसभर मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे शहराच्या विविध भागात पाणी साचलेले आहे. सततच्या पावसाने रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच ठिकठिकाणी सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीत अडकून पडलेल्या शहर वासीयांनी महापालिकेविराेधात रोष व्यक्त केला. रात्री उशिरापर्यंत पावसाने हजेरी लावली. सलगच्या पावसाने गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गोदाकाठावर नागरिकांनी पाण्यात फिरण्याचा आनंद घेतला. शहरात सकाळी आठपर्यंत २१.६ तसेच ८ ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत १५.२ मिमी पर्जन्याची नोंद झाली.
महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख लाभलेल्या इगतपूरीत संततधार सुरु आहे. त्यामुळे तालूक्यातील प्रमुख धरण असलेल्या दारणासह अन्य प्रकल्पांच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. त्र्यंबकेश्वर मध्येही पाऊस परतल्याने अवघ्या तालुक्यात भात लागवडीच्या कामांना वेग आला आहे. पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवणमध्येही पावसाचा जोर चांगला असल्याने धरणांना नवसंजीवनी मिळाली. अन्य तालूक्यातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने ग्रामीण जनता सुखावली आहे. जिल्ह्यात सकाळी ८ पर्यंत सरासरी २०.२ मिमी पर्जन्याची नोंद झाली. पेठमध्ये सर्वाधिक ९८.७ मिमी पर्जन्य झाले. सुरगाण्यात ८८.१, त्र्यंबकला ६०, इगतपूरीत ५६.४ तर नाशिक तालूक्यात १५.२ मिमी पाऊस झाला. दरम्यान, हवामान विभागाने नाशिकला रविवारी आॅरेंज तर सोमवारी (दि.५) येलो अलर्ट दिला आहे. या कालावधीत घाटमाथ्यासह विविध भागात जोरदार पाऊस पडू शकतो.
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख २४ प्रकल्पांमध्ये उपयुक्त साठा २८ हजार ७४८ दलघफुवर पोहचला असून त्याचे प्रमाण ४४ टक्के आहे. त्र्यंबकेश्वरमधील पावसामुळे गंगापूर ७२ टक्के भरले असून धरणात ३८९३ दलघफु पाणी आहे. दारणाचा विसर्ग १९ हजार ७१२ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. नांदुरमध्यमेश्वरमधून ३३ हजार ५७८ क्युसेक वेगाने जायकवाडीसाठी विसर्ग सुरु आहे. पालखेड धरणाच्या जलस्तर वाढल्याने त्यातून २१३१ क्युसेक वेगाने पाणी कादवा नदीत केला जात आहे. पुनदमधून २३०२ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.