Nashik News 
नाशिक

Kapurthala Memorial Nashik | गोदाघाटावरील कपूरथळा स्मारकाला नवीन झळाळी

Kapurthala Memorial Nashik | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र व केंद्र सरकारकडून अनेक विकासकामे सुरू झाली आहेत. गोदाघाटावरील कपूरथळा स्मारकाची पुनर्बाधणी करण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र व केंद्र सरकारकडून अनेक विकासकामे सुरू झाली आहेत. गोदाघाटावरील कपूरथळा स्मारकाची पुनर्बाधणी करण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे तसेच भाविकांसाठी येथे लंगर सेवाही सुरू करण्याचा मानस आहे. नाशिक येथे पंजाबचे काही मंत्री व अधिकारी यांनी नुकतीच भेट देऊन जागेची पाहणी केली.

यासंदर्भात पंजाब सरकारला अहवाल सादर करणार आहेत. अहवालानुसार पंजाब सरकारची मान्यता मिळाल्यावर कामाला सुरुवात केले जाईल. पंजाब सरकारच्या मालकीचे गोदाघाट परिसरातील बालाजी कोट व दिल्ली दरवाजा परिसरात ऐतिहासिक कपूरथळा स्मारक आहे. या स्मारकास पंजाबचे कॅबिनेटमंत्री मोहिंदर भगत यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी या स्मारकाच्या विकासाचा प्रस्ताव लवकरच पंजाब मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार असल्याचे सांगितले.

कपूरथळा स्मारकाची दुरवस्था झाली असून, तेथे आधुनिक सुविधांनी सुसज्ज स्मारक उभारण्याची मागणी आम आदमी पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते स्वप्निल घिया यांनी मागील आठवड्यात आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन केली होती.

या ठिकाणी भाविकांसाठी सुसज्ज विश्रामगृह, यात्रेकरूंसाठी लंगर हॉल व सिंहस्थानिमित्त देश विदेशातील पत्रकारांसाठी आंतरराष्ट्रीय माध्यम माहिती केंद्र उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार पंजाब सरकारने तातडीने पावले उचलत कॅबिनेट मंत्री मोहिंदर भगत यांनी गुरुवारी (दि. १२) वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसह स्मारकाची पाहणी केली.

यावेळी पक्षाचे प्रदेश संघटनमंत्री नविंदरसिंग अहलुवालिया उपस्थित होते. त्यांनीही या स्मारकाच्या पुनर्बाधणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे नमूद केले. पंजाब सरकार व स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून ही जागा भाविकांसाठी अधिक उपयुक्त स्वरूपात विकसित करण्याचा मानस असल्याचे मोहिंदर भगत यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच विकास आराखडा तयार करून पुनर्बाधणीस गती दिली जाईल, नाशिकमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांच्या दृष्टीने ही जागा अत्यंत महत्त्वाची असल्याने येथे अन्नदान व्यवस्था व सुसज्ज विश्रांतिगृह उभारण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पंजाब सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शीख समाजबांधवांचे स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.

या स्मारकाचा इतिहास

कपूरथळा स्मारक हे कपूरथळा राज्याच्या महाराजा रणधीर सिंह यांच्या स्मृतीत बांधलेली समाधी आहे. हे ठिकाण गोदावरीच्या घाटावर आहे. महाराजा रणधीर सिंह सन १८३१-१८७० दरम्यान कपूरथळा राज्याचे राजे होते. त्यांनी १८५२ ते १८७० पर्यंत राज्य केले.

ते अहलुवालिया वंशातील शीख शासक होते. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी ब्रिटिशांना मदत केली. दि. २ एप्रिल १८७० रोजी युरोपला जात असताना एडनच्या खाडीजवळ समुद्रात त्यांचा मृत्यू झाला.

तेथून त्यांचा मृतदेह मुंबईला आणण्यात आला आणि त्यांचा पुत्र प्रिन्स खरक सिंह याने नाशिकला आणून गोदावरी नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्यात आले. ती घुमटाकार रचना आहे. याच परिसरात पंजाबच्या शेवटच्या राणी जिंद कौर यांच्यावरही अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT