Vani Mulane Road Bridge 
नाशिक

Vani Mulane Road Bridge | पुणेगाव धरण कालवा पुलाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

Vani Mulane Road Bridge | वणी मुळाणे रस्त्यावरील केआरटी हायस्कूललगत असलेल्या पुणेगाव धरणाच्या डाव्या कालव्यावरील धोकादायक पुलाबाबतचे वृत्त दैनिक 'पुढारी' ने प्रकाशित करताच जलसंपदा विभाग खडबडून जागा झाला.

पुढारी वृत्तसेवा

वणी : पुढारी वृत्तसेवा

वणी मुळाणे रस्त्यावरील केआरटी हायस्कूललगत असलेल्या पुणेगाव धरणाच्या डाव्या कालव्यावरील धोकादायक पुलाबाबतचे वृत्त दैनिक 'पुढारी' ने प्रकाशित करताच जलसंपदा विभाग खडबडून जागा झाला. नागरिकांसाठी 'मृत्यूचा सापळा' ठरत असलेल्या या पुलाची तातडीने दखल घेत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

जलसंपदा विभागाचे उपअभियंता प्र. रा. लोढे व शाखा अभियंता विक्रम डावरे यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पूल, कालवा, संरक्षक भिंत आणि रस्त्याच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. पाहणीदरम्यान या ठिकाणी भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी मान्य केले.

अधिकाऱ्यांनी ही गंभीर बाब कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांच्या निदर्शनास आणून दिली असून, तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या ठिकाणी कोणती उपाययोजना करता येईल, याचा आराखडा तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राथमिक स्तरावर धोकादायक ठिकाणी इशारा फलक लावणे, पुलालगत मजबूत संरक्षक भिंत उभारणे, कठडे सुरक्षित करणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाय तातडीने हाती घेतले जाणार असल्याचे शाखा अभियंता विक्रम डावरे यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी दैनिक 'पुढारी'ने या पुलावरील गंभीर परिस्थितीवर सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. पुलावरील कमी उंचीचे कठडे, खराब रस्ता, खोल आणि खडकाळ कालवा तसेच शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणातील वर्दळ यामुळे हा परिसर अत्यंत धोकादायक झाल्याचेही वृत्तामध्ये नमूद केले होते.

तसेच दि. २६ जून रोजी एका दुचाकीस्वाराचा अपघात झाल्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत होता. दरम्यान, दैनिक 'पुढारी' च्या वृत्ताची गंभीर दखल घेत प्रशासनाने हालचाली सुरू केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष कामे तातडीने पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वणी - मुळाणे रस्त्यावरील पुणेगाव धरणाच्या डाव्या कालव्यावरील पुलाबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी पाहणी करून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत या ठिकाणी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.
- वैभव भागवत, कार्यकारी अभियंता
पुणेगाव धरणाच्या डाव्या कालव्यावरील पुलाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून, संबंधित ठिकाण भविष्यात अपघाताच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते, हे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तातडीने सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याबाबत वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
-प्र. रा. लोधे, उपविभागीय अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT