

वाडा : कांबारे ते वासिंद या मार्गावर अरुंद रस्त्यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात असून सुरक्षा साधनांचा अभाव जीवघेणा ठरणार असे वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध केले होते. वाडा परिसरात पावसाने हजेरी लावताच या मार्गावर अपघातांची मालिका सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. अरुंद रस्त्याच्या दुतर्फा कोणतेही संरक्षक कठडे नसल्याने एका ठिकाणी ट्रक रस्त्याच्या कडेला कलंडला, तर दुसरे अवजड वाहन थेट रस्त्याबाहेर जाऊन पलटी झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी, ही धोक्याची घंटा आहे, असे मत वाहनचालकांमधून व्यक्त केले जात आहे.
अरुंद, असुरक्षित व अती अवजड वाहनांची रेलचेल कांबारे ते वासिंद मार्गासाठी कर्दनकाळ ठरत असून आजपर्यंत शेकडो अपघात या मार्गावर झाले आहेत. सावरोली गावापासून पाईपलाइन व पिवळीपासून दहागाव या भागात वनविभागाचे क्षेत्र असून या पट्ट्यात रस्त्याचे रुंदीकरण व संरक्षक कठडे लावण्यात तांत्रिक अडचण निर्माण होत असल्याचे प्रशासनाकडून अनेकदा सांगण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभाग यांच्यात सुरू असणारी ही रस्सीखेच मात्र या मार्गावरून प्रवास करणार्या वाहनचालकांसह नागरिकांसठी मात्र मृत्यूचा सापळा बनली आहे. वाडा ते भिवंडी महामार्गाला मुंबईकडे जाणाऱ्यांसाठी हा मार्ग उत्तम पर्याय ठरत आहे. मात्र या मार्गावर दिवसेंदिवस अवजड वाहनांनी केलेला शिरकाव धोकादायक ठरत आहे.
पहिल्याच पावसात दोन ट्रक अपघातग्रस्त झाले असून ही मालिका आता नित्याची होणार आहे, असे स्थानिक सांगतात. सावरोली गावाजवळील तानसा नदीवरील पूल कमकुवत आहे. मात्र तरीही अती अवजड वाहनांना रोखण्यात पीडब्लूडी विभागाला यश येत नाही हे संतापजनक असल्याचे बोलले जात आहे.
आमदार दौलत दरोडा यांनी वन विभागासह पीडब्लूडी विभागाला पत्रव्यवहार करून अवजड वाहतूक रोखण्याची मागणी केली आहे. मात्र प्रशासन याबाबत अजूनही सुस्त असल्याचे दिसत आहे.
सावरोली व पिवळी जवळ वन विभागाच्या चौक्या असून पावत्या फाडून पैसे घेण्याशिवाय वन विभाग काहीही कर्तव्य बजावित नाही ,असा लोकांचा आरोप आहे. परिक्षेत्र अधिकारी गणेश परहार यांना विचारणा केली असता अवजड वाहतूक रोखणे आमच्या अधिकारात नसून संरक्षक कठडे बसविण्यासाठी मागणी आली तर पाहणी करून निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले. अवजड वाहतूक तात्काळ रोखून संरक्षक कठडे बांधणे, लोखंडी कमानी उभारून अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी वाहनचालक व येथील नागरिकांकडून केली जात आहे.