Prithviraj Chavan on RSS  
नाशिक

'आरएसएस कार्यालयांत वंदे मातरम् म्हटलयं का, तिरंगा फडकवलाय का?'

Prithviraj Chavan on RSS - पृथ्वीराज चव्हाण : सिंहस्थ टेंडरवरून अमित शाह अन् सत्ताधाऱ्यांवर टीका

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : काँग्रेसच्या राष्ट्रभक्तीवर गलिच्छ आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःचा इतिहास तपासावा. आरएसएसच्या कार्यालयांमध्ये कधी 'वंदे मातरम्' म्हटलं गेलंय का? तिथे कधी तिरंगा फडकवला गेलाय का? असा सवाल करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अन् माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांच्या राष्ट्रवादाचे वाभाडे काढले.

स्वातंत्र्यलढ्यात ज्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी केले, त्या काँग्रेसकडून राष्ट्रध्वज किंवा राष्ट्रगीताचा अवमान होणे निव्वळ अशक्य असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. माजी मुख्यमंत्री चव्हाण गुरुवारी (दि. २०) नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, मोदी सरकारच्या काळात होणाऱ्या अत्याचारांवर समाजात एक प्रकारची शांतता लादली जात होती. पण आता काळ बदलला आहे. 'जेन झी' आणि देशातील तरुणपिढी आता हा अन्याय मूकपणे सहन करणार नाही, असा इशारा देत चव्हाण यांनी आंदोलनांच्या माध्यमातून तरुणवर्ग आता सरकारला थेट धारेवर धरत असल्याचे स्पष्ट केले.

नाशिकमध्ये होऊ घातलेल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवरूनही चव्हाण यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. नाशिकमधील सिंहस्थाच्या अब्जावधीच्या विकासकामांची टेंडरं थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयातून निघत असल्याचे ऐकीवात आहे असा खळबळजनक टोला त्यांनी लगावला.

सिंहस्थाच्या नावाखाली निधीची उधळपट्टी सुरू असताना नाशिक शहराची झालेली दुरवस्था पाहून चव्हाण यांनी प्रशासनाला धारेवर धरले. नाशिक शहरात प्रवेश करतानाच रस्त्यांची जी बिकट अवस्था दिसते, त्यावरून नाशिकला 'खड्यांचे शहर' का म्हणतात, याचा आज प्रत्यक्ष अनुभव आला असा खोचक टोला त्यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT