Prithviraj Chavan on Kumbh Mela planning
नाशिक : कुंभमेळ्यासाठी जो निधी खर्च केला जात आहे, तो मुख्यमंत्र्यांच्या घरचा पैसा नाही, तर तो राज्यातील सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे या शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
नाशिकचा विकास झालाच पाहिजे आणि कुंभमेळ्यानंतरही ही विकासकामे टिकली पाहिजेत, यात दुमत नाही; मात्र जनतेचा हा पैसा नेमका कसा खर्च होतोय, याचा हिशेब पारदर्शक पद्धतीने समोर आला पाहिजे. नाशिककरांना विश्वासात न घेता हे काम सुरू असल्यामुळे लोकसहभाग शून्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सोमवारी (दि. ३१) शासकीय विश्रामगृहात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. उत्तराखंडमधील घडामोडींचा निषेध नोंदवताना चव्हाण यांनी भाजपवर सडकून टीका केली. चव्हाण म्हणाले की, तिथे घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असून यामुळे संपूर्ण देशाची मान खाली गेली आहे. पूजा करून तेथे स्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई केली जात नसेल, तर भाजपची मानसिकता काय आहे हे स्पष्ट होते.
भाजप अजूनही मनुस्मृतीच्या प्रभावातून बाहेर आलेला नाही आणि ते कधी बाहेर पडणारही नाहीत, याची खात्री पटली आहे. या निंदनीय कृत्यामध्ये सहभागी असलेल्यांवर तातडीने एफआयआर दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
समृद्धी महामार्गावरील वाढत्या दरोड्यांवर आणि गुन्हेगारीवर भाष्य करताना त्यांनी गृहखात्याच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवत ते म्हणाले की, आम्ही सत्तेत नसल्यामुळे थेट कारवाई करू शकत नाही; पण महामार्गावर प्राथमिक जनसुविधा न असणे अत्यंत चुकीचे आहे. नियमानुसार महामार्गावर पेट्रोल पंप, ई- चार्जिंग, स्वच्छतागृह आणि दुकाने असणे बंधनकारक आहे. मात्र, कोणत्या कंत्राटदाराला काम द्यायचे, यावरून सरकारमधील नेत्यांमध्येच आपापसात भांडणे सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला.
सरकारने जरांगे यांची दिशाभूल केली
मराठा आरक्षणाबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जरांगे - पाटील यांच्यासोबत नेमके काय करार झाले होते, हे मला माहीत नाही; मात्र, जरांगेंच्या मोर्चाला जनतेने मोठा प्रतिसाद दिला होता.
सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले होते. आता ते पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, याचा अर्थ सरकारने नक्कीच त्यांची दिशाभूल केली आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र यावर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले.