Priority given to Simhastha land acquisition: District Collector Ayush Prasad
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने भूसंपादन हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून, त्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे नाशिकचे नवनियुक्त जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले. बुधवारी (दि.८) पदभार स्वीकारताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सिंहस्थाच्या दृष्टीने भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यास इतर कामांना वेग देता येईल आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होतील. नाशिकमधील विकासकामे चांगल्या गतीने सुरू आहेत, त्यास आणखी चालना देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांपर्यंत सर्व सेवा प्रभावीपणे पोहोचाव्यात, यासाठी सुशासनावर विशेष भर असेल.
तसेच रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आदी महत्त्वाच्या विषयांवरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनात तंत्रज्ञानाचा वापर करून नाशिकच्या सिंहस्थाला वेगळी ओळख निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट असेल, असेही प्रसाद म्हणाले. आपत्ती व्यवस्थापनाकडेही लक्ष देणार असल्याचे सांगून त्यांनी प्रशासन आणि जनतेतील समन्वय वाढवण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी त्यांनी अधिकाऱ्यांकडून विविध कामांचा आढावा घेतला. गतिमान आणि पारदर्शी कारभार ठेवा, वेळेत सर्व कामे पूर्ण करण्यासाठी ई-ऑफिसचा वापर करा, केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे (नाशिक), डॉ. पवन दत्ता (इगतपुरी), उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, जिल्हा नियोजन अधिकारी दत्ता आव्हाड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी विक्रमकुमार, तहसीलदार पंकज पवार, वैशाली आव्हाड, उषाराणी देवगुणे, मंजूषा घाटगे, आबासाहेब तांबे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी त्यांना त्यांच्या पोशाखाबाबत प्रश्न केला असता त्यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले. मी यांचाही नाही त्यांचाही नाही, पण मी सर्वांचा आहे. मी अनेक ठिकाणी काम करून आलो आहे. त्यामुळे मी काय आहे, त्यापेक्षा प्रश्न सोडविण्यासाठी काय गरजेचे आहे ते मी करणार, असे जिल्हाधिकारी म्हणाले.