नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारीनिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक दौऱ्यावर येत असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रवासाच्या नियोजनात ऐनवेळे मोठी बदल होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ३१ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता असल्याने सुरक्षेच्या कारनास्तव राष्ट्रपतींचा त्र्यंबक येथील हेलिकॉप्टर दौरा रद्द करून, त्यांना रस्ते मार्गाने नेण्याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.
नियोजनानुसार, रामकुंडावरील ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा दुपारी १२.२ वाजता पार पडल्यानंतर राष्ट्रपती हवाई मार्गाने त्र्यंबकयेश्र्वर येथे दर्शनासाठी रवाना होणार होत्या. मात्र, दुपारी नाशिक आणि त्र्यंबकयेश्र्वर परिसरात दाट ढगांमुळे दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राष्ट्रपतींच्या सुरक्षेचा सर्वोच्च निकष लक्षात घेता संभाव्य धोका टाळण्यासाठी हवाई प्रवासाऐवजी रस्ते प्रवासाचा पर्याय निवडण्यात येत असल्याची माहिती सूत्रानी दिली.
या संभाव्य बदलाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व पोलिस प्रशासनाने तातडीने नवा वाहतूक आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. रामकुंडावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर राष्ट्रपतींचा ताफा नाशिक-त्र्यंबकयेश्र्वर महामार्गावरून रवाना केला जाईल.
हा संपूर्ण मार्ग 'ग्रीन कॉरिडॉर' म्हणून घोषित केला जाणार असून, मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल केले जातील. तसेच रस्त्यावर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरक्षा व्यवस्थेची अंतिम पाहणी केली जात आहे.