नाशिक : आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांची संख्या गेल्या वेळेपेक्षा दहा पटीने वाढण्याची शक्यता असून, प्रशासनाला गरज भासल्यास 'आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदे'च्या माध्यमातून १० हजार डॉक्टरांची सेवा आणि अन्नदानासाठी धान्य उपलब्ध करून देण्याची तयारी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी दर्शवली आहे. चार दिवसांच्या उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त शुक्रवारी (दि.१३) नाशिकमध्ये आगमन झाले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत बोलताना डॉ. तोगडिया म्हणाले की, गेल्या १२ वर्षांत दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे नाशिकच्या कुंभमेळ्यात १० पट अधिक गर्दी होईल. गर्दी नियंत्रण, स्वच्छता (सॅनिटेशन) आणि अफवा रोखणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. भाविकांना कमी चालावे लागेल असे नियोजन केल्यास गर्दीचा ताण कमी होईल. प्रयागराजच्या कुंभापासून 'हनुमान चालीसा सप्ताह' सुरू करण्यात आला असून, लाखो गावांतील या केंद्रांचे आता 'आरोग्य केंद्रां' मध्ये रूपांतर केले जात आहे.
तसेच रक्तदाब, मधुमेह आणि सांधेदुखीसारखे आजार कमी औषधांत नियंत्रित ठेवता येतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मोहिमेशी १० हजार डॉक्टर जोडले गेले असून, 'एक मूठभर धान्य' अभियानातून एक कोटी गरीब कुटुंबांना धान्य देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लोकशाहीत तरुणांनी आणि नागरिकांनी आंदोलन करणे हा त्यांचा अधिकार आहे, मात्र आंदोलनाला हिंसक वळण लागू नये, असे आवाहन डॉ. तोगडिया यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्र्यांचे काम चांगले !
डॉ. तोगडिया पुढे म्हणाले की, निवडणुका आल्या की पक्ष असतात, मात्र इतर वेळी सर्वजण हिंदूच असतात. भाजपपासून दूर असतो तर मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोललो नसतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन चांगले काम करत आहेत, असे गौरवोद्वार त्यांनी काढले. तसेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना अस्तित्वात नव्हती तेंव्हापासून आपण त्यांच्या घरी जात होतो, असे सांगत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बोलावले तरी त्यांच्या घरी जाण्याची तयारी आहे. आपण गेल्यास त्यांच्यावर हिंदूंचा अधिक मोठा शिक्का बसेल, असेही त्यांनी सांगितले.