सिटिझन फोरमचा 'आउटस्टॅण्डिंग सिटिझन ऑफ नाशिक पुरस्कार प्राचार्य प्रशांत पाटील यांना प्रदान करताना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम. समवेत फोरमचे अध्यक्ष आशिष कटारिया, हेमंत राठी, विक्रम सारडा, नारायण विंचूरकर आदी मान्यवर. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Praveen Gedam : जगभरात नाशिकचे ब्रॅण्डिंग व्हावे

एनसीएफतर्फे प्राचार्य पाटील यांना 'आउटस्टॅण्डिंग सिटिझन' पुरस्कार प्रदान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिकची ओळख केवळ धार्मिक पर्यटनापुरती मर्यादित न राहता ती उत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, वायनरी आदी क्षेत्रांत व्हावी यासाठी जगभर नाशिकचे ब्रॅण्डिंग केले पाहिजे. सिटिझन फोरमसारख्या संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले. विधानसभा निवडणुकीनंतर नाशिकला गुंतवणूकदारांसाठी परिषद भरवण्याची तयारी असल्याचेही डॉ. गेडाम यांनी सांगितले. (Nashik should be branded all over the world - Divisional Commissioner of Nashik Dr. Praveen Gedam)

नाशिक सिटिझन फोरमच्या वतीने दिला जाणारा 'आउटस्टॅण्डिंग सिटिझन ऑफ नाशिक'चा हा पुरस्कार मंगळवारी (दि. २४) सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य प्रशांत पाटील यांना डॉ. गेडाम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

नाशिक महानगर प्रदेश विकास आणि आगामी कुंभमेळा या विषयावर डॉ. गेडाम यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, अतिवेगाने पुढे गेलेल्या काही शहरांमध्ये नागरीकरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तसे होऊ नये यासाठी नियोजनपूर्वक शाश्वत विकास हवा. यापूर्वी देश ओळखले जात, आता शहरांमुळे देश ओळखला जातो. नाशिकची अशी ओळख ठसवण्यासाठी जनतेतून संकल्पना पुढे आल्या पाहिजेत. नाशिकची अर्थव्यवस्था झपाट्याने पुढे जात असताना नाशिक कुठे असेल याचा विचार आतापासून करायला हवा. पूर्वी देशांमुळे शहराची ओळख होती. आता गुंतवणूक कुठे करायची, असा विदेशात प्रश्न केला तर बंगळुरू असे नाव सांगितले जाते. अशीच नाशिकबाबत ओळख झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

यावेळी प्राचार्य पाटील यांनी सत्काराला उत्तर दिले. सामाजिक कार्य करताना नाशिककरांचे सहकार्य आणि दातृत्व ही मोठी जमेची बाजू आहे. कोरोना काळात आर्थिक मदतीचे आवाहन केल्यानंतर मदतीचा इतका ओघ आला की, आता मदत नको, असे सांगावे लागल्याचे ते म्हणाले. यावेळी फोरमचे अध्यक्ष आशिष कटारिया, हेमंत राठी, विक्रम सारडा, नारायण विंचूरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. फोरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन अहिरराव यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT