नाशिक: माजी नगरसेवक प्रकाश लोंढे व त्याचा पीएल ग्रुप मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर आता सर्व सदस्यांची संपत्ती व आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.
गेल्या १० वर्षांपासून पीएल गॅंग सक्रियपणे गुन्हेगारी क्षेत्रात वावरत आहे. या गॅंगच्या सदस्यांवर २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत १३ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. उर्वरित ४ फरार आहेत. यातील आरोपींची संख्या वाढू शकते. या गॅंगवर दाखल झालेल्या गुन्ह्यांत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जमीन बाळकावणे, जीवे मारण्याची धमकी अशा अनेक गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
त्यामुळे या गुन्ह्यात संपत्ती व मालमत्तेबाबतची सखोल चौकशी केली जाणार आहे, असे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले. नाइस संकुलातील गोळीबार प्रकरणानंतर पीएल गॅंगवर पोलिस यंत्रणेने कठोर कारवाई केली. याचाच एक भाग म्हणून मकोका या संघटित गुन्हेगारीचे कलमसुद्धा वाढवण्यात आले.