

नाशिक : सातपूर पोलिस ठाणे अंतर्गत प्रकरणात सामील असलेल्या पी. एल. गँगवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत माजी नगरसेवक प्रकाश मोगल लोंढे याच्या टोळीतील सदस्यांचा समावेश आहे.
या कारवाईमुळे प्रकाश लोंढे आणि त्याच्या गँगवरील पोलिसांचा फास आणखी आवळला जाणार आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ही कठोर कारवाई करत गुन्हेगारांना स्पष्ट इशारा दिला आहे की, शहरात कायद्याच्या बाहेर वागणाऱ्यांना आता मोक्का आणि इतर कडक कायद्याखाली कारवाईला सामोरे जावे लागेल. ५ ऑक्टोबरला त्र्यंबक रोडवरील नाइस संकुलातील बारमध्ये पहाटे झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी लोंढे कुटुंबीयांच्या गुन्हेगारी साम्राज्याला सुरूंग लावला आहे. त्यानंतर प्रकाश लोंढे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध अपहरण, अंबड येथील बेकायदेशीररीत्या बंगला बळकावणे, जमीन व्यवहारात खंडणी, बेकायदेशीर बांधकाम अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान प्रकाश मोगल लोंढे आणि त्याच्या टोळीतील सदस्यांनी संघटित गुन्हेगारी टोळी स्थापन करत हिंसाचार, अवैध शस्त्रांचा वापर, परिसरात दहशत निर्माण करणे, आर्थिक फायद्यासाठी हप्ते गोळा करणे आणि खंडणी वसुली अशा बेकायदेशीर कृती केल्या आहेत. हे सर्व गुन्हे नियोजित कट रचून आणि संघटित स्वरूपात केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (मोक्का) अंतर्गत कलम ३ (१) (अ), ३(२) आणि ३(४) लागू करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास अंबड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
उर्वरित गुन्हेगारांना इशारा
शहरातील जे गुन्हेगार अद्याप त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीतून परावृत्त झाले नाहीत त्यांच्यावरही मोक्का, एमपीडीए तसेच इतर कठोर कायद्यांनुसार कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिला आहे.