Prakash Londhe arrested in Satpur firing case
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सातपूर येथील बारमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, दीपक ऊर्फ नाना प्रकाश लोंढे, संतोष पवार व अमोल पगारे यांना अटक करण्यात आली. सदर गोळीबार पूर्वनियोजित कट असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. सातपूर अपहरण आणि अंबड पोलिस ठाण्यात खंडणी आणि घराचा बळजबरीने ताबा घेण्याच्या प्रकरणात या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
५ ऑक्टोबर रोजी पहाटे २ च्या सुमारास नाशिक-त्रंबक रोडवरील आयटीआय सिग्नल, नाईस संकुल येथील औरा बार येथे वरुण विजय तिवारी याच्यावर भूषण प्रकाश लोंढे याच्या साथीदारांनी गोळीबार केला होता. त्यामध्ये वरुण हा गंभीर जखमी झाला आहे. सदर प्रकार हा खंडणी प्रकरणातून झाल्याची माहिती समोर आली होती. हॉटेल मालक बिपीन पुरुषोत्तम पटेल व संजय सुरेंद्र शर्मा यांच्याकडे व्यवसायाच्या १० टक्के खंडणी भूषण प्रकाश लोंढे यांनी मागितली होती.
त्यामुळे सदर गोळीबार करण्यात आला. यासंदर्भात सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शांताराम भडांगे यांच्या फिर्यादीवरून जीवे मारण्याचा प्रयत्न व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रमुख संशयित आरोपी शुभम पाटील ऊर्फ भुरा, दुर्गेश वाघमारे व आकाश ऊर्फ अभिजित अडांगळे हे सध्या पोलिस कोठडीत आहेत. सर्व संशयित आरोपींवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाईसुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे या घटनेचा तपास करत आहेत.
भाडेतत्त्वावर घेतलेला बंगला खाली करण्यासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी प्रकाश लोंढे, दीपक लोंढे व भूषण लोंढे तसेच सनी विठ्ठलकर व निखिल निकुंभ यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात खंडणी व बेकायदेशीर घराचा ताब्यात घेतल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीच्या मयत पत्नीच्या नावावर असलेला पुष्कर बंगला व पुष्कर कंपनी यावर फायनान्स कंपनीचे कर्ज होते.
लोंढे पिता पुत्रांनी सदर बंगला सुनील साखरे यांच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर घेतला. त्याच्यामध्ये स्वतःचे कार्यालय थाटले. फायनान्स कंपनीने बंगला खाली करण्यासाठी विचारणा केली असता त्यांना तसेच फिर्यादी यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.