helicopter  
नाशिक

Prachand helicopter production Nashik| 'प्रचंड'ची गर्जना आता नाशिकमधून; 'एचएएल'मध्ये हेलिकॉप्टरनिर्मिती

६२ हजार ७०० कोटींच्या १५६ लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर प्रकल्पासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सतीश डोंगरे

भारतीय लष्कर आणि हवाई दलाची ताकद अधिक भक्कम करणाऱ्या स्वदेशी 'प्रचंड' (लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर-एलसीएच) निर्मितीमध्ये आता नाशिकची निर्णायक भूमिका असणार आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या ओझर येथील विमाननिर्मिती विभागात ६२ हजार ७०० कोटी रुपयांच्या १५६ लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी पायाभूत सुविधांचा विस्तार सुरू करण्यात आला आहे. २०३३ पर्यंत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी नाशिकला दुय्यम असेंब्ली केंद्र म्हणून विकसित केले जात असून, त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील नाशिकचे महत्त्व आणखी वाढणार आहे.

या प्रकल्पासाठी एचएएलने कारखान्यातील 'शॉप २५' आणि 'शॉप ३१'चे अत्याधुनिक असेंब्ली विभागात रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी अॅल्युमिनियम पार्टिशन्स, फॉल्स सीलिंग आणि इतर नागरी कामांच्या निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आधुनिक लढाऊ हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले धुळमुक्त, तापमान नियंत्रित आणि अत्याधुनिक 'क्लीन रूम' वातावरण येथे तयार केले जाणार आहे.

नवीन इमारती उभारण्याऐवजी विद्यमान असा आहे प्रकल्प

औद्योगिक इमारतींचे 'रेट्रोफिटिंग' करून आधुनिक असेंब्ली लाइन विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे वेळेची बचत होऊन उत्पादन प्रक्रियेला वेग मिळणार आहे. कर्नाटकातील तुमकुर येथील ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर फॅक्टरी हे या प्रकल्पाचे मुख्य केंद्र असले, तरी वाढत्या उत्पादन क्षमतेसाठी नाशिकचे केंद्र महत्त्वाची जबाबदारी पार पाडणार आहे. 'आत्मनिर्भर भारत' अभियानांतर्गत या प्रकल्पात ६५ टक्क्यांहून अधिक भाग स्वदेशी बनावटीचा असेल.

हेलिकॉप्टरसाठी लागणारे विविध सुटे भाग खासगी उद्योग आणि एमएसएमई कंपन्यांकडून तयार करून घेतले जाणार असून, नाशिकमध्ये डायनॅमिक घटक, अत्याधुनिक एव्हिओनिक्स आणि मिशन सिस्टिमचे एकत्रीकरण करून पूर्ण लढाऊ हेलिकॉप्टरचीनिर्मिती केली जाईल. ओझर येथील एचएएल युनिटला 'मिग-२१', 'मिग-२७' आणि 'सुखोई-३० एमकेआय' यांसारख्या लढाऊ विमानांच्या निर्मिती व ओव्हरहॉलिंगचा अनेक दशकांचा अनुभव आहे. फायटर जेट्सच्या यशस्वी निर्मितीनंतर आता हेलिकॉप्टर असेंब्ली क्षेत्रात प्रवेश होत असल्याने नाशिकच्या संरक्षण उद्योगाला नवी उंची मिळणार आहे.

'एलसीएच'चा पूर्ण विकास एचएएलकडून केला जात आहे. १५६ लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरनिर्मितीची ऑर्डर एअरफोर्सकडून मिळाली असून, यातील काही हेलिकॉप्टरची निर्यात देखील केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या प्रॉडक्शन लाइनचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले होते. आता प्रत्यक्ष निर्मितीला प्रारंभ झाला आहे. या प्रकल्पात स्थानिक उद्योजकांना प्राधान्य द्यावे, असे एचएएलला निर्देश आहेत. कारण अहिल्यानगर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर हा डिफेन्स कॉरिडॉर लवकरच जाहीर केला जाणार असून, स्वदेशीकरण आणि व्हॅडरच्या विकासासाठी विकासार लवकरच डिफेन्स इनोव्हेशन सेंटर आणि एचएएल यांच्यात सामंजस्य करार होणार आहे.

- प्रदीप पेशकार, संचालक, डिफेन्स इनोव्हेशन सेंटर

भारत सरकार उपक्रम

एकूण प्रकल्प मूल्य : ६२,७०० कोटी

एकूण हेलिकॉप्टर : १५६

भारतीय लष्करासाठी : ९०

भारतीय हवाई दलासाठी : ६६

स्वदेशी घटकांचा वाटा : ६५ टक्क्यांहून अधिक

२५० हून अधिक एमएसएमई कंपन्यांचा सहभाग

८,५०० पेक्षा अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीची अपेक्षा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT