पिंपळगाव बसवंत : पुढारी वृत्तसेवा
शहरात पाणी येण्याची वेळ आणि वीजपुरवठ्याचा हमखास खेळ, असा प्रकार नित्याचाच झालेला असून, शहरासाठी मुबलक पाणी उपलब्ध असूनही नागरिकांना केवळ वीज महावितरणच्या हलगर्जीपणामुळे पाणी मिळत नाही. याबाबत नागरिक व महिलांमध्ये प्रचंड नाराजी असून, यापुढील काळात पाणीपुरवठ्यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास पिंपळगाव वीज वितरण कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.
शहरात सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी नगर परिषदेचा पाणीपुरवठा विभाग आणि वीज वितरण कंपनी यांच्यामध्ये समन्वयाची मागणी नागरिकांनी केली आहे. शहराला मागील अनेक वर्षांपासून थेट पालखेड धरणातून पाणीपुरवठा होतो. विस्तारित पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून माणसी १३५ लिटर पाणी देण्याची योजना असली, तरी वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शहरातील नागरिक पाण्यापासून वंचित राहात आहेत.
पिंपळगाव शहरात नळजोडण्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रत्येक घरात विजेची मोटार लावल्याशिवाय पाणी मिळत नाही. परंतु पिंपळगाव विभाग वीज वितरण कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस पाणीपुरवठा होण्याच्या नेमक्याच वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याचा आरोप आहे.
वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असला, तरी वीज कंपनीचे अधिकारी कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेतात. त्यामुळे शहरातील महिला, नागरिक यांना मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच पाणी मिळत नसल्यामुळे कुचंबणा होते. नागरिकांचा हा मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी नगर परिषदेचा पाणीपुरवठा विभाग आणि वीज वितरण कंपनी यांनी आपसात समन्वय ठेवून ज्या भागात पाणीपुरवठा होणार आहे,
त्यावेळी त्या भागाचा वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, शहरातील उपनगरात, वाडी-वस्तीवर दिवसभर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा केला जातो. यासंदर्भात नगर परिषदेने दिवसभरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक वीज वितरण कंपनीला देऊन त्या - त्या वेळेत त्या त्या विभागात वीजपुरवठा अखंड ठेवावा, यासाठी खास कर्मचारी नेमावेत व नागरिकांची गैरसोय टाळावी, अशा मागण्या नागरिकांनी केल्या आहेत.
पाणीपुरवठा होण्याची वेळ आणि वीजपुरवठा खंडित होण्याची वेळ हा योगायोग नक्कीच नाही. हा वीज कंपनीचा गलथान कारभार आहे. स्मार्ट मीटर बसवून वीज ग्राहकांकडून अवाच्या सव्वा बिले वसूल करत लूट करणाऱ्या वीज वितरण कंपनीने ज्या भागात पाणीपुरवठा होतो, त्या भागात वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. विजेचा लपंडाव थांबवावा अन्यथा वीज कंपनीवर हंडा मोर्चा काढण्यात येईल.पुंडलिकराव गायकवाड सामाजिक कार्यकर्ते, पिंपळगाव बसवंत