नाशिक : पोलिसांच्या नियंत्रण कक्षात उभारलेल्या कमांड अ‍ॅण्ड कंट्रोलला मिळत असलेले ‘सीसीटीव्हीं’चे 'व्हिज्युअल्स'. (छाया: हेमंत घोरपडे)
नाशिक

Police Control Room Nashik : अर्धे शहर पोलिसांच्या नजर टप्प्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज शहर पोलिसांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील सुमारे ८०० पैकी २५० ‘सीसीटीव्हीं’चे 'व्हिज्युअल्स' पोलिसांच्या नियंत्रण कक्षात उभारलेल्या कमांड अ‍ॅण्ड कंट्रोलला मिळत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक हालचालींवर पोलिसांना बारीक नजर ठेवता येणार आहे. ('Visuals' of 250 out of 800 'CCTVs' in Nashik city are being received by the command and control set up in the police control room)

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त ‘सीसीटीव्हीं’ची गरज सर्वाधिक राहणार असल्याने जून २०२३ मध्ये शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षात 'कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रूम' कार्यान्वित केला आहे, तर स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात सुमारे ८०० सीसीटीव्ही बसवण्यात आले. मात्र या 'सीसीटीव्हीं'चे फुटेज पोलिसांच्या कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रूमला मिळत नसल्याने या कॅमेऱ्यांचा फायदा होत नसल्याचे लक्षात आले. स्मार्ट सिटीच्या रेंगाळलेल्या कामांचा फटका पोलिस प्रशासनालाही बसत आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी लोकसभा निवडणुकीतच स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराची कानउघाडणी केल्याची चर्चा होती. त्यानंतर शहरातील सुमारे २५० 'सीसीटीव्हीं'चे फुटेज कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रूममध्ये मिळण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित सीसीटीव्हींचे फुटेज आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, सीसीटीव्हींचा थेट अ‍ॅक्सेस मिळू लागल्याने शहरातील प्रत्येक हालचाली या यंत्रणेच्या नजरेच्या टप्प्यात येणार आहे. गुन्हेगारी नियंत्रणासह शहरातील परिस्थितीवर नजर ठेवणे पोलिसांना शक्य होत आहे. आगामी सिंहस्थातही या कॅमेऱ्यांचा फायदा पोलिसांना होणार आहे.

ई-चलनला मुहूर्त लागेना

स्मार्ट सिटीकडून 'सीसीटीव्हीं'चे फुटेज मिळत असले, तरी त्याद्वारे बेशिस्त वाहन चालकांवर ई-चलनची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. तांत्रिक कारणास्तव स्मार्ट सिटी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ई-चलन कित्येक वर्षांपासून रखडले आहे. ही प्रक्रिया पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई करता येणार आहे.

स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्हींचे व्हिज्युअल्स पोलिसांच्या नियंत्रण कक्षास मिळत असल्याने शहरातील प्रत्येक हालचालींसह वाहतुकीवरही लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. उर्वरित सीसीटीव्हींचे फुटेज व ई-चलन प्रक्रिया सुरू करण्यासाठी स्मार्ट सिटीकडे पाठपुरावा करीत आहोत.
चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, मुख्यालय, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT