Pitru Pandharvada begins today
नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाद्रपद मृत पूर्वजांचे स्मरण करून पितरांचे श्राद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पितृपंधरवड्यास सोमवारी (दि. ८) प्रारंभ होत आहे. हिंदू धर्मात पितृपक्ष अतिशय महत्त्वाचा कालखंड मानला जातो. हा काळ साधारणपणे पौर्णिमेपासून अश्विन अमावास्येपर्यंत असतो. २१ सप्टेंबरपर्यंत हा पंधरवडा असून, १५ दिवसांच्या या कालावधीत आपल्या मृत पूर्वजांचे स्मरण करून त्यांना अन्न, पाणी व तर्पण अर्पण करण्याची प्रथा आहे. 'पितृऋण' फेडण्यासाठी हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो.
पितृपक्षामध्ये दररोज श्राद्ध, पिंडदान, तर्पण अशा विधींचे आयोजन केले जाते. गंगाजल, तिळाचे पाणी, कुश, तांदूळ, दूध, मध व इतर पदार्थ यांचा उपयोग करून विधी केले जातात. पितरांना संतुष्ट केल्यास त्यांचे आशीर्वाद मिळतात, असे मानले जाते. पूर्वजांचा आत्मा तृप्त झाल्यास घरातील संकटे दूर होतात व समृद्धी प्राप्त होते, अशी धारणा आहे.
या काळात सण, आनंदोत्सव, शुभकार्ये केली जात नाहीत. विवाह, गृहप्रवेश, नामकरण आदी समारंभआयोजित केले जात नाहीत. लोक साधे आहार-विहार करतात. श्रद्धा, भक्ती व कृतज्ञतेने हा काळ पाळला जातो. काही लोक गयामध्ये किंवा पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये जाऊन पिंडदान करतात. पौर्णिमा मृत्यू असल्यास त्याचे महालय श्राद्ध पौर्णिमा किंवा सर्वपित्री अमावस्या करावे. भरणी श्राद्ध गुरुवारी (दि. ११) आहे. प्रथम भरणी श्राद्ध केल्यानंतरच वर्षश्राद्ध केले जाते, अशी माहिती डॉ. नरेंद्र धारणे यांनी दिली.
पितृपक्षास सोमवार (दि. ८) पासून प्रारंभ होत आहे. पितृपक्षाचा संदेश जीवनातील 'कृतज्ञता' आणि 'ऋणानुबंध' यांची आठवण करून देतो. आपले अस्तित्व पूर्वजांमुळे आहे, ही जाणीव दृढ करण्यासाठी पितृपक्षाचे पालन करून विधी केला जातो. पूर्वजांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पवित्र मार्ग आहे.डॉ. नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यातच पितृपक्ष सुरू झाल्याने भाज्यांचे दर अधिकच वाढणार असल्याची माहिती घाऊक बाजारातील भाजीविक्रेत्यांनी दिली. घाऊक बाजारात कोथिंबिरीची जुडी ५५ ते ६० रुपये, तर मेथीची जुडी ३५ ते ४० रुपयांना विक्री झाली. अन्य भाज्यांचे दरही वाढलेले आहेत. किमान आठवडाभर तरी भाज्यांचे दर वाढलेलेच राहतील, असा अंदाज विक्रेते व्यक्त करत आहेत.