Pitru Paksha : पितृपक्षात होणार कोट्यवधीची उलाढाल, त्र्यंबकला आजपासून श्राद्धविधीसाठी उसळणार गर्दी File Photo
नाशिक

Pitru Paksha : पितृपक्षात होणार कोट्यवधीची उलाढाल, त्र्यंबकला आजपासून श्राद्धविधीसाठी उसळणार गर्दी

भाविकांना वाढीव खर्चाचा फटका

पुढारी वृत्तसेवा

Pitru Paksha will generate a turnover of crores, Trimbak will be crowded for Shraddha rituals from today

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा सोमवार (दि.८) पासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. मात्र, गतवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्या दोन दिवसांत पंचक आल्याने नारायण नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध हे विधी होणार नाहीत. परंतु ११ सप्टेंबरपासून सर्वपित्री अमावास्येपर्यंत (दि.२१) दररोज हजारो भाविक श्राद्धविधी पार पाडतील, असा अंदाज आहे. त्र्यंबकेश्वर हे श्राद्धविधींसाठी प्रसिद्ध स्थळ असून, येथे वर्षभर नक्षत्रांच्या मुहूर्तानुसार नारायण नागबली, त्रिपिंडी श्राद्ध व कालसर्प शांतीसाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. तथापि, पितृपंधरवडा हा श्राद्ध विधीसाठी विशेष फलदायी मानला जातो. त्यामुळे साहजिकच त्र्यंबकेश्वरसाठी तो आर्थिक उलाढालीतून लाभदायी ठरणार आहे.

त्र्यंबकेश्वर परिसरात पितृपक्षाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने निवासाच्या सुविधांचा अभाव प्रकषनि जाणवतो. या अनुभवातूनच मागील काही महिन्यांपासून या पंधरवड्यासाठी आगाऊ बुकिंग सुरू झाले आहे. साधारणपणे ५००। रुपयांत मिळणारी खोली या दिवसांत १,५०० ते २,००० रुपयांपर्यंत भाड्याने घ्यावी लागते. तीन दिवसांचा नारायण नागबली विधी करण्यासाठी केवळ मुक्कामासाठीच सुमारे सहा हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे अनेक भाविकांना त्र्यंबकेश्वरऐवजी नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील लॉजमध्ये किंवा थेट नाशिक शहरातील निवासस्थानी राहावे लागते. माहितीअभावी काही भाविकांना तर आपल्या वाहनातच मुक्काम करावा लागतो. शहरातील लॉजिंग बोर्डिंग, मठ, आश्रमशाळा या पंधरा दिवसांसाठी ठोक रक्कम देऊन घेतल्या जातात. याशिवाय प्रवासी वाहतूक, भोजन व्यवस्था, पूजेचे साहित्य, नारळ, विधीसाठी लागणारे पांढरे कपडे अशा व्यवसायांनाही या काळात चांगलीच चलती येते.

व्यवस्थेवर ताण, गैरसोयीचा त्रास

शहरात पंधरवड्यातील प्रचंड उलाढालीचा परिणाम स्थानिक व्यवस्थेवर दिसून येतो. कुशावर्त तीर्थाची स्वच्छता, शहरांतर्गत साफसफाई यासाठी योग्य नियोजनाचा अभाव जाणवतो. भूमिगत गटाराच्या कामामुळे रस्त्यांवर सर्वत्र खड्डे पडले असून, पावसात पायी चालणे कठीण झाले आहे. विजेचा लंपडाव आणि रस्त्यांवरील अंधारामुळे रात्री येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, शासन यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

बहुमजली वाहनतळ उभारूनही सुटेना कोंडी

शहरातील सर्वांत मोठी समस्या म्हणजे बेशिस्त पार्किंग आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी. येथे केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेतून पाच कोटी रुपयांचा बहुमजली वाहनतळ उभारला आहे. तरीसुद्धा पार्किंगची अडचण कायम राहिल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पितृपक्षाच्या काळात रोज हजारो भाविक येतात. त्यापैकी बहुतेक जण तीन दिवस मुक्कामी राहतात. मात्र त्यांच्या वाहनांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याची स्थिती सध्या दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT