नाशिक : धनराज माळी
राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेमध्ये डिजिटल व्यवहारांना प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. फोन पे, गुगल पे व तत्सम यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. मागील सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत चार महिन्याचा विचार केल्यास 62.59 लाखांहून अधिक यूपीआयद्वारे तिकीट व्यवहार झाले आहे. त्यातून 83.67 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे.
मध्यंतरी बसेसची दुरवस्था आणि रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे ‘एसटीचा खडखडाट आणि डोक्याचा भडभडाट’ अशी म्हण रूढ झाली होती. तसे म्हटले, तर एसटीचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवासाची हमी देणारा आहे. ते कोणीही नाकारू शकत नाही. एसटीची आर्थिक स्थिती अनेकदा गंभीर झाली, तरीही महाराष्ट्रात एसटी सेवा तेवढ्याच जोमाने सुरू आहे. अवैध प्रवासी वाहतुकीचा बससेवेवर नक्कीच परिणाम झाला आहे. मात्र, वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांची पसंती एसटी प्रवासाला मिळत आहे. त्यात शासनाकडून लाडक्या बहिणींसाठी दिलेली अर्ध्या तिकिटाची सवलत असो की, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवाससेवा यामुळे एसटीकडे प्रवाशी संख्या वाढली आहे.
लालपरी ते ई-बससेवा
एसटी महामंडळाची ओळख निर्माण करणारी लालपरी ते शिवशाही आणि आताची आधुनिक पर्यावरण पूरक ई-ग्रीन बससेवा असा एसटीने वातानुकूलित व आरामदायी बससेवेपर्यंत भरारी घेतली आहे. एसटीच्या या सेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहेत. सध्याचा ई-बससेवा प्रवाशांचे खास आकर्षण ठरत आहेत. या सेवेत सर्वाधिक यूपीआय व डिजिटल आणि ऑनलाइन तिकीट सेवेला प्रतिसाद मिळत आहे.
सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीतील आकडेवारीनुसार एसटी महामंडळामध्ये दररोज लाखोंच्या संख्येने यूपीआय व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण होत आहेत. सप्टेंबर महिन्यात 49.79 लाखांहून अधिक तिकीट व्यवहार यूपीआयद्वारे झाले आहेत. त्यातून 64 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. ही संख्या ऑक्टोबर महिन्यात वाढून 77.32 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. नोव्हेंबरमध्ये यूपीआय व्यवहारांतून 78.66 कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची नोंद आहे. डिसेंबरमध्येही प्रवाशांची यूपीआय तिकीटसेवेला वाढती पसंती कायम राहिली आहे. एकूण 62.59 लाखांहून अधिक तिकीट व्यवहार यूपीआयद्वारे झाले आहेत. त्यातून 83.67 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे.
अपहाराला चाप
याबरोबरच काही वाहकांकडून होणारा पैशाचा अपहार रोखण्यासाठीदेखील डिजिटल पेमेंट प्रक्रियेची मदत झाली आहे. त्यामुळे यूपीआय व्यवहारांमुळे पारदर्शकता वाढली आहे. महसूल गळतीला आळा बसण्यास मदत होत आहे. येत्या काळात डिजिटल पेमेंटचा वापर आणखी वाढेल, असा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला.
सुरक्षित प्रवासाची हमी
एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास आहेच. त्याबरोबरच प्रवास करताना दुर्दैवाने काही अपघात झाल्यास शासनाकडून अपघातग्रस्तांना उपचाराचा खर्च व मृत झाल्यास तत्काळ सानुग्रह अनुदानाची सुविधा आहे. त्याचे महत्त्व आता प्रवाशांना कळले आहे. त्यामुळे प्रवाशांचा एसटी प्रवासाला पसंती वाढली आहे.
नको सुट्या पैशांची कटकट, तिकीट काढा झटपट
एसटी महामंडळाने बसस्थानकात, तिकीट खिडक्यांवर तसेच प्रवासादरम्यान कंडक्टरकडून यूपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत आहे. रोख रकमेचा व सुटे पैसे ठेवण्याचा त्रास कमी झाला आहे. अर्थात, त्यामुळे सुट्या पैशांवरून वाहकांशी होणाऱ्या अनावश्यक वाद विवादाला पूर्ण विराम मिळाला आहे.