ओझर : शहरातील अल्पसंख्याक निधीतून बसवण्यात आलेले सौरपथदीप बंद पडल्याबाबत दैनिक पुढारी वृत्तपत्राने बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करत बंद पडलेले सौर पथदीप सुरू केले आहेत.
सौर पथदीप 15 दिवसापासून बंद असल्याने परिसरात अंधार परसला होता. यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असून चोरी व अपघाताची शक्यता वाढली होती. या गंभीर विषयाकडे माध्यमांनी लक्ष वेधल्यानंतर काही तासांत नगरपरिषदेच्या विद्युत विभागाने कार्यवाही सुरू केली. यावेळी नगरपरिषद विद्युत विभागाचे मुकादम संतोष जमधाडे, आधार भंडारे व तुकाराम जाधव यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन बंद पडलेले सौरपथदीप सुरू केले.
पथदीप सुरू झाल्याने परिसर उजळला आहे. नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. माध्यमांनी नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवल्याने प्रश्न सुटल्याची भावना स्थानिकांत आहे. भविष्यात अशा कामांवर नियमित देखरेख ठेवावी व ठेकेदारांवर योग्य ती जबाबदारी निश्चित करावी, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
प्रसार माध्यमांची ताकद ही लोकहितासाठी प्रभावी ठरते. योग्य वेळी दखल घेतल्यास प्रशासनालाही वेगाने काम करावे लागते.सद्दाम पिंजारी, ओझर