SIR voter list pudhari photo
नाशिक

Nashik SIR Voter | नाशिक जिल्ह्यातील 7 लाखांहून अधिक मतदारांना नोटीस; 'एसआयआर' पडताळणी प्रक्रियेला वेग!

Nashik SIR Voter | डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर शक्य नसलेल्या भागात बीएलओंवर जबाबदारी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेत विविध मतदारांच्या पडताळणीला आता वेग येणार असून, तब्बल ७ लाख ३४ हजार ६८५ मतदारांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत. या नोटीसा तयार करण्याची प्रक्रिया मंगळवार (दि. ८) पासून सुरू होणार आहे.

या नोटीसांच्या माध्यमातून जिल्ह्यातील मॅपिंग न झालेले ३ लाख २ हजार ८२७ मतदार व मॅपिंगमध्ये तफावत अथवा अनियमितता आढळलेल्या ४ लाख ३१ हजार ८५८ मतदारांकडून कागदपत्रे व पुरावे मागवून त्यांच्या नोंदींची पडताळणी केली जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर एसआयआर-२०२६ अंतर्गत विधानसभा मतदारसंघनिहाय नोटीसांची यादी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ९२ हजार २३७ मतदारांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत. त्याच्यापाठोपाठ नाशिक पूर्व ७१ हजार ९०६, देवळाली ६४ हजार ५२२, मालेगाव बाह्य ६२ हजार ९९९ आणि नाशिक मध्य ६१ हजार ४२६ मतदारांचा समावेश आहे.

बागलाणमध्ये २५ हजार ५०२ ही सर्वांत कमी संख्या आहे. नोटीस मिळाल्याने संबंधित मतदाराचे नाव तात्काळ मतदार यादीतून वगळले जाणार नाही. ही पडताळणी प्रक्रियेतील एक महत्त्वाची पायरी असून, संबंधित मतदाराला आपले अस्तित्व, ओळख व पात्रता सिद्ध करण्यासाठी आयोगाने मान्य केलेली कागदपत्रे सादर करण्याची संधी मिळणार आहे.

सत्र परीक्षांच्या तोंडावर शिक्षकांवरील ताण

  1. एसआयआरच्या प्रक्रियेमुळे शाळा सुरू झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात शिक्षकांना निवडणूक विभागाच्या कामासाठी शाळाबाहेर जावे लागले होते.

  2. आता पुन्हा सत्र परीक्षांचा कालावधी जवळ येत असताना नोटीसा वाटप, मतदारांकडून कागदपत्रे स्वीकारणे, हरकतींची नोंद करणे आणि त्यावरील सुनावणीची प्रक्रिया यामुळे शिक्षकांच्या नियमित शैक्षणिक कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

  3. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षांच्या तयारीच्या काळात शिक्षकांना पुन्हा शाळाबाह्य कामाला जुंपल्यास त्यांच्या शिक्षणाचे काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

डिजिटल नोटीसा; तरीही बीएलओंवर भार

  • नोटीसा जनरेट करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार असून, शक्य त्या ठिकाणी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून नोटीसा बजावण्यात येणार आहेत.

  • ज्या ठिकाणी डिजिटल माध्यमातून नोटीस पोहोचवणे शक्य होणार नाही, तिथे प्रत्यक्ष नोटीस बजावण्याची जबाबदारी पुन्हा बीएलओंवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक कामासाठी यापूर्वीच शाळाबाह्य जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या शिक्षकांवरील कामाचा ताण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT