नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर तब्बल ४,०८१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पोलिस विभागाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने केलेल्या नियोजनात १५ प्रमुख रस्त्यांचा समावेश असून, यामध्ये नियमित कॅमेऱ्यांसह फेस रिकग्निशन सिस्टीम, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन आणि पीटीझेड कॅमेऱ्यांचा समावेश आहे. यापैकी १,०६३ कॅमेरे तात्पुरते, तर ३,०१८ कॅमेरे कायमस्वरूपी असणार आहेत.
नियोजनानुसार नियमित कॅमेऱ्यांची संख्या सर्वाधिक ३,३२८ असून, त्याबरोबर २२१ एफआरएस, ३७ एएनपीआर आणि ४९५ पीटीझेड कॅमेरे बसविण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी हालचालींवर लक्ष ठेवण्याबरोबरच संशयास्पद व्यक्तींची ओळख, वाहनांची क्रमांक तपासणी आणि संवेदनशील भागांचे व्यापक निरीक्षण करणे शक्य होणार आहे.
रस्तानिहाय नियोजनात इमर्जन्सी आणि व्हीआयपी रोडवर सर्वाधिक ४७६ कॅमेऱ्यांची तरतूद करण्यात आली आहे. साईबाबा चौक मार्गावर ४१५, पुणे रोडवर ४०६, द्वारका रोडवर ३८०, तर गंगापूर रोडवर ३१९ कॅमेऱ्यांचे नियोजन आहे. म्हसरूळ रोडवर ३३३, त्र्यंबक रोडवर २६७, सरदारगाव रोडवर २०० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. दिंडोरी रोडवर १५९, नाशिकरोडवर १९०, देवळाली कॅम्प ते तळेगाव रोडवर ३८०, देवळाली कॅम्प ते त्र्यंबकेश्वर मार्गावर ५८ आणि ओल्ड हायवे स्टेशन परिसरात ११३ कॅमेऱ्यांची तरतूद आहे. पेठ रोडवर १९१ कॅमेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक शहरात दाखल होणार असल्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान असणार आहे. या पार्श्वभूमीवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून गर्दीच्या हालचालींचे सातत्याने निरीक्षण करता येणार आहे. गर्दी अचानक वाढल्यास संबंधित यंत्रणांना तातडीने सूचना देऊन रहदारी व सुरक्षेचे नियोजन बदलणे शक्य होणार आहे.
विशेष म्हणजे, संवेदनशील ठिकाणी बसवण्यात येणारे पीटीझेड कॅमेरे उपयुक्त ठरणार आहेत. एएनपीआर प्रणालीमुळे संशयास्पद किंवा तपासासाठी आवश्यक वाहनांची ओळख पटवण्यास मदत होईल. फेस रिकग्निशन प्रणालीचा वापरही सुरक्षा व्यवस्थेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
कुंभमेळ्याच्या काळात हरविलेले नागरिक, संशयित व्यक्ती, चोरीच्या घटना, रहदारी कोंडी तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून विविध ठिकाणांवरील कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवता येणार आहे. त्यामुळे पारंपरिक बंदोबस्तासोबत तंत्रज्ञानाची जोड मिळून कुंभमेळ्याची सुरक्षा अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कायमस्वरूपी बसवण्यात येणार ३,०१८ कॅमेरे सिंहस्थ कुंभमेळ्यानंतरही शहराच्या सुरक्षेसाठी वापरता येणार आहेत. त्यामुळे सिंहस्थानिमित्त उभारण्यात येणारी ही यंत्रणा केवळ काही दिवसांच्या बंदोबस्तापुरती मर्यादित न राहता, नाशिकच्या दीर्घकालीन सुरक्षा व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे. शहरातील प्रमुख प्रवेशमार्ग, वाहतूक मार्ग, गर्दीची ठिकाणे आणि महत्त्वाच्या परिसरावर लक्ष ठेवण्याची क्षमता पोलिसांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणार आहे.
एकूण कॅमेरे: ४,०८१
नियमित कॅमेरे: ३,३२८
एफआरएस (FRS): २२१
एएनपीआर (ANPR): ३७
पीटीझेड (PTZ): ४९५
तात्पुरते कॅमेरे: १,०६३
कायमस्वरूपी कॅमेरे: ३,०१८
प्रमुख रस्ते: १५