नाशिक

Food Poisoning | मालेगावजवळ भेळभत्त्यातून 140 जणांना विषबाधा! 31 लहान मुलांचा समावेश; 4 वर्षांच्या चिमुकल्याची प्रकृती गंभीर

Food Poisoning | नांदगाव बुद्रुकच्या आठवडे बाजारातील प्रकार; चार वर्षांच्या बालकाची प्रकृती गंभीर

पुढारी वृत्तसेवा


मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील नांदगाव (बु) येथील रविवारच्या आठवडे बाजारातून खरेदी केलेला भेळभत्ता खाल्ल्यानंतर १४० जणांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी (दि. २८) समोर आली. यात ३१ बालकांचा समावेश असून, उलटी, जुलाब, पोटदुखी आणि तापाचा त्रास झाल्याने सर्वांना मालेगाव सामान्य व महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुरू सागर कुवर (४) या बालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, भेळभत्ता विक्रेता हिलाल बाबूलाल मोरे (रा. पाटणे) याला पोलिसांनी ताब्यात घेत अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.

नांदगाव (बु) येथे रविवारी (दि. २७) आठवडे बाजार होता. येथे विक्रेता मोरे याच्याकडून खरेदी केलेला भेळभत्ता खाल्ल्यानंतर पहाटेच्या सुमारास त्रास सुरू झाला. सोमवारी (दि. २८) सकाळपासून रुग्णांची संख्या वाढू लागली. नांदगावसह डोंगरगाव, चिंचावड, आनंदवाडी आणि आघार परिसरातील नागरिकांना याचा फटका बसला.

बाधितांच्या माहितीनुसार, बाजारातून आणलेल्या कुरमुऱ्यांमध्ये विक्रेत्याने दिलेली चटणी मिसळून खाल्ल्यानंतरच उलटी व जुलाबाचा त्रास झाला. विशेष म्हणजे केवळ कुरमुरे खालेल्या व्यक्तींना त्रास झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चटणीमधून विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

मात्र, विषबाधेचे नेमके कारण प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी विक्रेता मोरे याला ताब्यात घेत चौकशी केली आहे. भेळभत्ता व चटणीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, खा. शोभा बच्छाव, महापौर नसरीन शेख, उपमहापौर शान-ए-हिंद आणि स्थायी सभापती एजाज बेग यांनी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली.

जिल्हाधिकाऱ्यांकडून आरोग्य यंत्रणेला आवश्यक सूचना:

मालेगाव येथील विषबाधेच्या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच बाधित रुग्णांना तातडीने आवश्यक वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या असून, नाशिकहून डॉक्टरांचे विशेष पथक मालेगावच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात जाऊन बाधितांची विचारपूस केली.

"सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर पुढील २४ तास वैद्यकीय देखरेखीखाली उपचार करण्यात येत आहेत. मात्र, चार वर्षांच्या बालकाला झटके येत असल्यामुळे खबरदारी म्हणून त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे."
- डॉ. प्रल्हाद गुठे, वैद्यकीय अधीक्षक, सामान्य रुग्णालय, मालेगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT