नाशिक : राज्यात अवयवदान आणि प्रत्यारोपणाची प्रक्रिया क्लिष्ट आहे. तुलनेत आंध्र प्रदेश आणि चेन्नईमध्ये अवयव प्रत्यारोपणाचे प्रमाण अधिक आहे.
नाशिकच्या रुग्णास अवयव प्रत्यारोपणासाठी मुंबई व अन्य मोठ्या शहरांमध्ये यावे लागत असल्याने, राज्याच्या प्रत्येक विभागात प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र स्थापन करावे, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य भवन येथे अवयव प्रत्यारोपणविषयी बैठक पार पडली असता, आमदार फरांदे यांनी अवयवदान आणि प्रत्यारोपणाला गती देण्याची गरज असल्याचे म्हटले. तर, राज्यातील अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेला अधिक गती, पारदर्शकता आणि परिणामकारकता मिळवून अधिकाधिक गरजू रुग्णांना जीवनदान देता येणार असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले. नाशिकसह अमरावती, कोल्हापूर आणि सोलापूर येथे नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र स्थापन करण्यात येईल, असेही आश्वासन आबिटकर यांनी दिले.
शासकीय रुग्णालयात मेंदूमृत रुग्ण येत असतानाही त्याची नोंदणी केली जात नसल्याचे आमदार फरांदे यांनी सांगितले. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये अवयव वाचवण्यासाठी यंत्रणा उभी करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. शासकीय रुग्णालयांमध्ये मानवी अवयव पुनर्प्राप्ती केंद्रांची निर्मिती आणि त्या ठिकाणी समन्वयकांची नियुक्ती करण्यात येईल. अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्यक रुग्णालय नोंदणी प्रक्रियेचा तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही आरोग्यमंत्र्यांनी दिले. तसेच विभागीय प्राधिकरण समित्यांनी जिवंत अवयवदान परवानगी प्रक्रियेला सुलभ करण्यात येत असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले. बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्यसेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. पल्लवी सापळे, ग्लोबल हॉस्पिटलचे डॉक्टर भरत शहा आदी उपस्थित होते.