Organ Transplant Nashik | नाशिकमध्ये प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्राची स्थापना
नाशिक : नाशिकसह अमरावती, कोल्हापूर येथे नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्राची स्थापना, शासकीय रुग्णालयांमध्ये मानवी अवयव पुनर्प्राप्ती केंद्रांची निर्मिती आणि त्या ठिकाणी समन्वयकांची नियुक्ती याबाबतची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली आहे.
आरोग्य भवन येथे आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणविषयी बैठक झाली. या बैठकीस आमदार देवयानी फरांदे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधिकारी, मानवी अवयव प्रत्यारोपण तसेच विधी व न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आबिटकरांनी ही घोषणा केली.
मंत्री आबिटकर म्हणाले की, अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्यक रुग्णालय नोंदणी प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय प्रक्रिया तसेच विभागीय प्राधिकरण समित्यांकडून जिवंत अवयवदान परवानगी प्रक्रियेला सुलभ करण्यात येईल. अवयवदानास नवे आयाम मिळत असून, राज्यातील अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेला अधिक गती मिळत आहे. तसेच अवयवदान प्रक्रियेत असलेली पारदर्शकता आणि परिणामकारतेमुळे अधिकाधिक गरजू रुग्णांना जीवनदान देता येणार आहे,
राज्यभर जनजागृती मोहीम
अवयवदानासाठी जनजागृती, सन्मान व सामाजिक सहभाग असल्याने राज्यभर जनजागृती मोहीम राबवून जनतेत अवयवदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करावे. 1 मे महाराष्ट्र दिनी, जिल्हास्तरावर अवयवदाते आणि त्यांच्या कुटुंबीयांचा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. अवयव प्रत्यारोपण करणार्या डॉक्टर आणि समन्वयकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या जातील. 'फेलोशिप इन क्रिटिकल मेडिसीन' हा पदव्युत्तर अभ्यासक्रम वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तत्काळ सुरू केला जाणार असल्याचे मंत्री आबिटकरांनी सांगितले.

