नाशिक : सतीश डोंगरे
एका अवयवाची प्रतीक्षा आणि त्या प्रतीक्षेचा शेवट मृत्यूने. कोणाच्या आयुष्याची दोरी डायलिसिसच्या मशीनला बांधलेली, कोणाचे हृदय नव्या धडधडीची वाट पाहत, तर कोणाचे यकृत जीवनाची आस धरून होते. डोळ्यांसमोर आशेचा किरण असतानाच प्रत्यारोपणासाठी योग्य अवयव न मिळाल्याने महाराष्ट्रातील २९७ रुग्णांची प्रतीक्षा अखेरची ठरली.
२०२० ते २०२४ या पाच वर्षांत अवयवाच्या प्रतीक्षा यादीतील या रुग्णांनी जीव गमावला. हा आकडा केवळ मृत्यूची संख्या नाही, तर वेळेत मिळू न शकलेल्या एका अवयवासाठी संपलेल्या २९७ आयुष्यांची वेदनादायी कहाणी आहे. अजूनही राज्यात २० हजार ५५३ रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत.
राष्ट्रीय अवयव व ऊती प्रत्यारोपण संस्थेच्या (नोटो) २०२४ च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात १७२ मृत अवयवदाते झाले. त्यांच्या माध्यमातून ४६६ मृत-दाता अवयव प्रत्यारोपणे झाली. यामध्ये २७१ मूत्रपिंड, १५० यकृत, २२ हृदय आणि २२ फुफ्फुस प्रत्यारोपणांचा समावेश आहे. मृत आणि जिवंत दाते मिळून राज्यात २०२४ मध्ये दोन हजार ७३ अवयव प्रत्यारोपणे झाली. तर, महाराष्ट्रात २०२० मध्ये ७४, २०२१ मध्ये ९५, २०२२ मध्ये १०५, २०२३ मध्ये १४८ आणि २०२४ मध्ये १७२ मृत अवयवदाते नोंदविले गेले. म्हणजे दोन वर्षांत मृत दात्यांच्या संख्येत सुमारे ६४ टक्क्यांची वाढ झाली. मात्र, गरजेच्या तुलनेत ही संख्या अद्याप अपुरी आहे.
८ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील २० हजार ५५३ रुग्ण प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत होते. त्यामध्ये १३ हजार ४५ मूत्रपिंड, ६ हजार ९२४ यकृत, ३४१ हृदय, १६२ फुफ्फुसे आणि ८१ स्वादुपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत होते. अर्थात आता या संख्येत आणखी वाढ झाली आहे. यातील सर्वाधिक संख्या मूत्रपिंडाच्या रुग्णांची आहे.
मूत्रपिंड निकामी झालेल्या अनेक रुग्णांना नियमित डायलिसिसवर अवलंबून राहावे लागते. प्रत्यारोपण हा अनेकांसाठी जीवनमान सुधारण्याचा महत्त्वाचा पर्याय असतो; मात्र योग्य दाता मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. दरम्यान, २०२० ते २०२४ या कालावधीत महाराष्ट्रातील २९७ रुग्णांचा प्रतीक्षा यादीत मृत्यू झाला. ही संख्या अवयवदानाच्या गरजेची तीव्रता अधोरेखित करते.
केंद्र सरकारच्या माहितीनुसार डिसेंबर २०२५ पर्यंत महाराष्ट्रात २० हजार ५५३ रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत होते. देशातील ही सर्वाधिक राज्यनिहाय प्रतीक्षा यादी आहे. यामध्ये १३ हजार ४५ रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्यात अवयवदानाची संख्या वाढत असली, तरी गरजेच्या तुलनेत उपलब्ध अवयव अद्याप अपुरे आहेत. ब्रेन-डेड झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांकडून अवयवदानासाठी संमती मिळणे, रुग्णालयांमध्ये वेळेत ब्रेन-डेड ओळखणे, अवयव सुरक्षितपणे काढणे आणि योग्य रुग्णापर्यंत ते वेळेत पोहोचविणे ही यंत्रणेसमोरील आव्हाने आहेत.
२०२३ : नाशिकजवळ अपघातात ब्रेनडेड झालेल्या ३१ वर्षीय व्यक्तीच्या अवयवदानातून नऊ रुग्णांना नवजीवन मिळाले.
२०२३ : पेठ तालुक्यातील ३४ वर्षीय शेतकऱ्याच्या अवयवदानातून पाच जणांना जीवनदान मिळाले.
२०२४ : निफाडमधील ४६ वर्षीय डॉक्टरच्या अवयवदानातून पाच जणांना जीवनदान मिळाले; नाशिकमध्ये किडनी प्रत्यारोपण झाले, तर इतर अवयव पुण्याला पाठविले.
२०२४ : नाशिकमधील २४ वर्षीय तरुणाचा ब्रेनडेडनंतर अवयवदान केले.
२०२६ : नाशिक जिल्ह्यातील गोलवाड येथील १४ वर्षीय मुलाच्या अवयवदानातून सहा जणांना जीवनदान मिळाल्याची नोंद आहे.
"अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ टीमच्या मदतीने अवयव प्रत्यारोपण करणे शक्य होत आहे. आम्ही गेल्या सहा महिन्यात लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वीपणे केले आहे. आता अवयवदात्यांनी पुढे येऊन अवयवदान करणे गरजेचे आहे."— डॉ. अमोल जाधव, लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन, मेडिकव्हर हॉस्पिटल