SIR Process 
नाशिक

SIR Process | 'लोकशाही वाचवा' अभियानांतर्गत नाशिकमध्ये एसआयआर प्रक्रियेविरोधात विरोधकांचा जोरदार मोर्चा

SIR Process | विरोधकांचा मोर्चा : मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एसआयआर प्रक्रियेला विरोध दर्शवित मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी नाशिकमध्ये शनिवारी (दि. २४) 'लोकशाही वाचवा' मोर्चा काढण्यात आला. यात प्रमुख विरोधी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शेतकरी-विद्यार्थी संघटना आणि सजग नागरिक सहभागी झाले होते.

मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात नावे वगळली जात असल्याचा आरोप करीत या प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याची मागणी आंदोलकांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. शिवाजी रोड, नेहरू गार्डन, महात्मा गांधी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

'ज्ञानेश कुमार राजीनामा द्या, जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है' तसेच 'मोदींचा राजीनामा झालाच पाहिजे' अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चाला संबोधित करताना माकप नेते डॉ. डी. एल. कराड यांनी, एसआयआर प्रक्रियेमुळे गरीब, कष्टकरी, मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्यक समाजातील नागरिकांच्या मतदानाच्या हक्कावर गदा येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

मतदार यादीतून पात्र मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी यासंदर्भात पुरावे सादर केल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निवडणूक आयोगाची निष्पक्षता कायम राखण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, एसआयआर प्रक्रिया तातडीने थांबवून रद्द करावी, पूर्वीची मतदारयादी पुनर्संचयित करावी आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी नागरी समाजाचा सहभाग असलेली स्वतंत्र व निष्पक्ष यंत्रणा निर्माण करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. देशातील लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करावा, असे आवाहनही करण्यात आले.

मोर्चान शहरध्यक्ष नीलेश खैरे, उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष छब्बू नागरे, भाकपचे राजू डेसले, मनसेचे राकेश परदेशी, विद्यार्थी संघटनेचे समाधान बागूळ, तल्हा शेख, काँग्रेसचे सचिव प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती जाधव, वत्सला खैरे, उद्धव पवार, ज्ञानेश्वर काळे, जयेश पोकळे, अरुण दोंदे, कुसुम चव्हाण सहभागी झाले होते.

तीन प्रमुख मागण्यांचे निवेदन

  • एसआयआर प्रक्रिया तात्काळ रद्द करावी.

  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवावे.

  • निवडणूक आयुक्त नियुक्तीची स्वतंत्र प्रक्रिया करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT