पिंपळगाव बसवंत (नाशिक) : नाशिक जिल्ह्यात चर्चेत असलेल्या नाफेड कांदा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत येथील नाफेडचे कार्यालय गत चार ते पाच महिन्यांपासून बंद असून, या कार्यालयात असणारे कांदा खरेदी-विक्रीचे महत्त्वाचे कागदपत्रे इतरत्र हलविण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
येथील कार्यालय चार-पाच महिन्यांपासून नाशिक येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. कार्यालय स्थलांतर आणि कागदपत्रे हलविण्यात आल्यामुळे कांदा घोटाळ्याला मोठी पुष्टी मिळत असून, याबाबत कांदा वर्तुळात उलटसुलट चर्चा होत आहे. दरम्यान, चार-पाच महिन्यांपूर्वीच पिंपळगाव बसवंत येथील विश्वासराव माधवराव मोरे यांनी जिल्ह्यातील कांदा घोटाळ्याचा तपास व्हावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने उच्च न्यायालयाने संबंधितांना नोटीसही जारी करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कार्यालयाचे व कागदपत्रांचे स्थलांतर झाले की काय याबाबत परिसरात चर्चा होत आहे.
गत ५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून पिंपळगाव बसवंत येथे नाफेडचे कार्यालय गोदाम शीतगृह व मोकळी जागा आहे. प्रारंभी शेतकरी हितासाठी नाफेडचे कामकाज चालत असले तरी गेल्या काही दिवसांपासून बोगस खरेदी-विक्री कांदा घोटाळा अफरातफर यामुळे नाफेड संस्था बदनाम होऊन चर्चेत आली आहे. सध्या पिंपळगाव बसवंत येथील कार्यालयात कुणीही अधिकारी, कर्मचारी नाही. कामकाज पूर्णपणे ठप्प असून, हजारो टन क्षमतेचे कांदा गोदाम ओस पडली आहेत. याबाबत नाफेडचे अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.