Lasalgaon Onion Price Pudhari
नाशिक

Nashik Onion Prices | कांददरात तेजी; आठवडाभरात झाली तब्बल 700 रुपयांची वाढ

Nashik Onion Prices | खरीप आवक महिनाभर लांबणीवर; लासलगावी क्विंटलचा दर 4,525 रुपयांवर

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव : राकेश बोरा
कांद्याच्या बाजारभावात पुन्हा तेजी निर्माण झाली असून, शनिवारी (दि. १०) उन्हाळ कांद्याला कमाल ३,६०१ रुपयांचा दर मिळाला, तर सरासरी ३,३५१ रुपये प्रतिक्विंटल मिळाला होता. त्यात सुधारणा होत सोमवारी (दि. १९) कमाल ४,५२५, तर सरासरी ४,०५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

मागील आठवड्यात घाऊक बाजारातील दरात सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जुन्या रब्बीचा कांदा साठा कमी होत असताना, नवीन खरीप कांद्याची आवक जवळपास महिनाभर लांबणीवर पडल्यामुळे बाजारात कांद्याची उपलब्धता घटली आहे. परिणामी, कांद्याच्या दराचा आलेख चढता आहे.

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत सोमवारी कांद्याचा दर क्विंटलला ४ हजार ४२५ रुपयांपर्यंत पोहोचला असून, शनिवाऱ्याच्या तुलनेत दरामध्ये प्रतिकिलो सुमारे दोन रुपयांची वाढ झाली.

गेल्या आठवड्यात बाजारातील दैनंदिन कांदा आवक सुमारे १५ टक्क्यांनी घटल्याची माहिती हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे (एचपीईए) विकास सिंह यांनी दिली.
उशिराच्या खरीप हंगामातील लागवड वाढल्यास जानेवारीपासून बाजारात कांद्याचा पुरवठा वाढू शकतो. परिणामी, त्यावेळी दरात मोठी घसरण होण्याची शक्यताही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दिवाळीनंतर आवकवाढ शक्य

१. जिल्ह्यातील नवीन खरीप कांद्याची आवक साधारणपणे १५ ऑक्टोबरच्या आसपास सुरू होते. यंदा त्याला विलंब झाला आहे.
२. दिवाळीनंतर, साधारण १० नोव्हेंबरच्या आसपास नाशिक जिल्ह्यातील कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
३. राजस्थानमधील अलवर भागातून नवीन कांद्याची आवक १ नोव्हेंबरच्या आसपास सुरू होऊ शकते. मध्य प्रदेश आणि गुजरातमधील आवकही ऑक्टोबरच्या अखेरीस वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी काळात बाजारातील कांद्याची उपलब्धता सुधारण्याची शक्यता आहे.

मागणीमुळे दर चढे

  • ससा आणि दिवाळीच्या सणासुदीच्या काळात कांद्याची मागणी वाढत असल्यामुळे नवीन आवक सुरू झाली, तरी लगेच दर कमी होतील असे नाही. काही व्यापाऱ्यांच्या मते, नवीन कांद्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू होण्यापूर्वी दरात आणखी प्रतिकिलो ८ ते १० रुपयांची वाढ होऊ शकते.

  • आवक वाढल्यानंतर बाजारभावात हळूहळू नरमाई येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, सणासुदीच्या काळातील मागणीमुळे अल्पअवधीत दर चढे राहू शकतात.

लागवडीला फटका; बाजारात विलंब

  • या हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत सुमारे ४० टक्के कमी पाऊस झाल्यामुळे कांद्याची पेरणी आणि पुनर्रलगवडीवर परिणाम झाला. परिणामी खरीप कांद्याचे पीक बाजारात येण्यास विलंब झाला आहे. भारतात कांद्याचे उत्पादन प्रामुख्याने रब्बी आणि खरीप अशा दोन हंगामांमध्ये घेतले जाते. नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये लागवड होणाऱ्या रब्बी कांद्याची काढणी मार्च - एप्रिलमध्ये केली जाते.

  • देशाच्या एकूण कांदा उत्पादनात या हंगामाचा वाटा जवळजवळ दोन तृतीयांश आहे. हा कांदा साठवून सप्टेंबर - ऑक्टोबरपर्यंत बाजारची गरज भागवली जाते. त्यानंतर खरीप कांद्याची आवक सुरू होऊन पुरवठ्याला आधार मिलतो. मात्र, यंदा रब्बी कांदा साठा कमी होत असताना, खरीप कांद्याची आवक अपेक्षेपेक्षा उशिरा होत असल्यामुळे बाजारात दर टिकून आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT