ठळक मुद्दे
नाशिक जिल्ह्यातील नऊ हजार 988 कांदा शेतकऱ्यांना अनुदान मंजूर
शासनाने १८ कोटी ५८ लाख रुपयांचे वितरण केले आहे
जिल्ह्यातील 9 हजार 988 शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले होते.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नऊ हजार 988 कांदा शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करण्यात आले असून, त्यासाठी शासनाने १८ कोटी ५८ लाख रुपयांचे वितरण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून असलेली अनुदानाची प्रतीक्षा संपली आहे. शासनाने 14 हजार 661 शेतकऱ्यांना कांदा अनुदानापोटी 28.32 कोटींचा निधी वितरीत केला आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न समित्या, खासगी बाजार थेट पणन अनुज्ञप्तीधारक आणि नाफेड केंद्राकडे १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी मर्यादेत अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने २७ मार्च २०२३ रोजी घेतला होता. 1 फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या परंतु या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील नोंदीमुळे अपात्र करण्यात आले होते.
जिल्ह्यातील 9 हजार 988 शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले होते. याबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी अपात्र ठरलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत त्रिसदस्यीय समितीने सादर केलेला अहवाल स्वीकारून जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्यात यावे, अशी मागणी १२ जून २०२५ ला पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. तसेच त्यांच्यासोबत याबाबत सकारात्मक चर्चादेखील करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन निर्णय काढण्यात आला आहे.
शेतकऱ्यांकडून थकीत अनुदान मंजुरीसाठी शासनावर दबाब वाढला होता. पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीनुसार अनुदान मंजुरीसाठीचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली. शेतकऱ्यांना थकीत अनुदान ऑनलाइन पद्धतीने थेट बॅंक खात्यावर मिळणार आहे.