

कोळपेवाडी: राज्य शासनाने दोन वर्षापूर्वी कांदा उत्पादक शेतकर्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केले होते, मात्र पात्र असूनही केवळ तांत्रिक अडचणींमुळे कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले होते.
दरम्यान, याप्रश्नी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे, असे सांगत, महायुती शासनाकडून कोपरगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांना 52 लाख 71, 644 रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. (Latest Ahilyanagar News)
कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समिती व नाफेडमध्ये 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या कोपरगावातील शेतकर्यांना, 200 क्विंटलपर्यंत 350 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला होता, परंतू तांत्रिक अडचणींसह कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे अनुदानासाठी पात्र असतानादेखील कांदा उत्पादक शेतकर्यांना अनुदान मिळाले नव्हते. ही समस्या लक्षात घेवून, आमदार काळे यांनी, कोपरगाव मतदार संघातील कांदा उत्पादक शेतकर्यांना अनुदान मिळावे, या मागणीसाठी मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांना भेटून निवेदन दिले होते. याबाबत त्यांचा सतत पाठपुरावा सुरु होता.
आमदार आशुतोष काळे यांचे लाभार्थी शेतकर्यांनी, तर पाठपुराव्याची दखल घेत, 52.71 लाख रुपये अनुदान मंजूर केल्याबद्दल आमदार काळे यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांचे आभार मानले.
लाभधारक शेतकर्यांमध्ये आनंदी- आनंद!
महायुती शासनाने कोपरगाव तालुक्यातील शेतकर्यांना अखेर अनुदान लाभाचा दिलासा दिला आहे. पात्र आहेत, परंतू केवळ तांत्रिक अडचणींमुळे अनुदान न मिळालेले एकूण 210 शेतकर्यांना 52 लाख 71644 रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यामुळे लाभधारक शेतकर्यांमध्ये आनंदी- आनंदाचे वातावरण पसरले आहे.