वणी (नाशिक) : धोडंबे रस्त्यावरील संगमनेर फाटा परिसरात सडलेला कांदा आणि इतर कचरा उघड्यावर टाकल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच, रस्त्यालगत पडलेला कांदा व त्यासाठी रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
वणी शिवारात कांदा व्यापाऱ्यांचे शेड आणि चाळी मोठ्या प्रमाणावर आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी झाल्यानंतर वाहनांद्वारे कांदा या चाळींमध्ये पोहोचवण्यात येतो. त्यानंतर मजुरांच्या मदतीने कांद्याची प्रतवारी करण्यात येते. यादरम्यान निकृष्ट, सडलेला माल किंवा पावसामुळे खराब झालेला कांदा नियमानुसार ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोमध्ये टाकणे आवश्यक असतानाही काही व्यापाऱ्यांकडून तो थेट रस्त्याच्या कडेला फेकून दिला जात आहे.
या प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, स्थानिक रहिवासी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी व प्रवाशांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय कांदे खाण्यासाठी रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यातून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरी आरोग्य आणि रस्ते सुरक्षितता धोक्यात आणणार हा प्रकार त्वरित थांबविण्यात यावा, अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी वणी ग्रामपंचायत व बाजार समितीकडे केली आहे.