Onion : 'कांद्याला ३००० रुपये दर द्या'  File Photo
नाशिक

Onion Farmer : ऐन दिवाळीत कांदा उत्पादकांना आर्थिक फटका

नाफेडची स्वस्त दराने कांदा विक्री; सरासरी भाव 1050 प्रति क्विंट

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव (नाशिक) : येथील बाजार समितीमध्ये कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गुरुवार (दि. १६) कांद्याला सरासरी १०५० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. येथील मुख्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याला किमान ४००, कमाल १४०० तर सरासरी १०५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाले.

त्यातच आता नाफेडकडून शहरी भागात स्वस्त दरात कांद्याची विक्री सुरू करण्यात आली आहे. या विक्रीमुळे खुल्या बाजारातील दरावर दबाव येत असून, त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आधीच भाव घसरलेले असताना नाफेडच्या स्वस्त विक्री धोरणामुळे दर आणखी खाली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दीपावलीनिमित्त बाजार समिती सात दिवस बंद राहणार असल्याने बाजार समिती सुरू झाल्यानंतर आवक वाढण्याची शक्यता असल्याने दरात आणखी घसरण होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. यंदा परतीच्या पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या चाळीत साठवलेला उन्हाळी कांदाही ओलसरपणामुळे खराब झाला आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती तर, दुसरीकडे कांद्याचे घसरलेले दर अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. लासलगाव बाजार समितीत सध्या उन्हाळी कांद्याबरोबरच नव्या लाल कांद्याची आवक वाढू लागली आहे. दिवाळीनंतर बाजार पुन्हा सुरू झाल्यावर ही आवक आणखी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. परंतु, हा नवीन कांदा टिकाऊ नसल्याने शेतकऱ्यांना तो जास्त दिवस साठवून ठेवणे शक्य नाही. त्यामुळे बाजार उघडताच कमी भावात कांदा विकण्याची वेळ अनेकांवर येणार आहे.

नाशिक : एनसीसीएफ कार्यालयास टाळे ठोकतांना दीपक पगार.

कांद्याचे पैसे मिळत नसल्याने एनसीसीएफच्या कार्यालयाला ठोकळे ताळे

रयत क्रांती संघटना आक्रमक

नाशिक : राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांनी २०२२- २३ मध्ये खरेदी केलेल्या कांद्याचे १० टक्के पैसे शेतकऱ्यांना मिळत नसल्याने संतप्त रयत क्रांती संघटनेने गुरूवारी (दि.16) एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून घेत कार्यालयास टाळे ठोकले. पोलिस निरीक्षक विश्‍वास पाटील यांच्या मध्यस्थीनंतर सोमवारपर्यंत पैसे वर्ग करण्याचे आश्‍वासन देण्यात आले.

केंद्राच्या भाव स्थिरीकरण योजनेंतर्गत 'एनसीसीएफ'ने गेल्या वर्षी अडीच लाख टन उन्हाळ (रब्बी) कांदा खरेदी केला. शेतकऱ्यांना दहा टक्के पैसे उशिराने दिले जातात. जिल्ह्यातील १५० शेतकऱ्यांना सव्वादोन ते अडीच कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत. 'एनसीसीएफ'ला कांदा विक्री केला आहे. मात्र, दोन वर्ष होऊनही पैसे मिळत नसल्याने याविषयी विचारणा करण्यासाठी रयत क्रांतीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा कृषी मूल्य आयोगाचे सदस्य दीपक पगार व संतोष पगार हे पोहोचले. पण शाखा व्यवस्थापक बी. बी. सिंग कार्यालयात नव्हते. त्यांना फोन करुन विनंती केली. मात्र, अर्धा तास, एक तास होऊनही सिंग येत नसल्याने आक्रमक झालेल्या पगार यांनी 'एनसीसीएफ'च्या कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी कर्मचाऱ्यांनी तातडीने मुंबईनाका पोलिसांना याविषयी माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कार्यालयाचा दरवाजा उघडत शाखा व्यवस्थापकांच्या दालनात चर्चा केली. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होतील, असे सिंग यांनी सांगितले. त्यानुसार सोमवार (दि.२०) पर्यंत अल्टिमेटम देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT