

नाशिक : अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असतानाच, आता कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
देशातील शेतकऱ्यांनी मे पासून साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येण्याची शक्यता असून, त्यासोबतच खरीप (लाल) कांदाही बाजारात दाखल होणार असल्याने , यापुढील काळात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता कमी आहे. याबाबत 'एचपीईए'ने पत्राव्दारे केंद्र सरकारला हे कळविले आहे.
हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशनने (एचपीईए) केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयास पत्र दिले. त्यानुसार, देशातील कांद्याची सद्यस्थितीचे ढोबळ चित्र मांडले आहे. शेतकऱ्यांनी ३५ ते ४० टक्के कांदा अजूनही साठवून ठेवला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत हा कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल होईल. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे. अलीकडे बेंगळुरू परिसरात खरीप कांदा काढणीला सुरुवात झाली आहे.
राजस्थान आणि गुजरात या दोन्ही राज्यांच्या गुणवत्तेमुळे खरीप कांद्याच्या पुरवठ्यात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या अहवालांवरून असे दिसून येते की, महाराष्ट्रात उशीरा खरीप लागवड जास्त झाली आहे. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत हा कांदा बाजारात पोहोचण्याची अपेक्षा आहे. तर कर्नाटक, बांगलादेश, श्रीलंका आणि इतर शेजारील देश भारतीय मूळ बियाण्यांचा वापर करून कांदा उत्पादन करत आहेत. चीन आणि पाकिस्तानमध्ये भारतीय कांदा बियाण्यांना जास्त मागणी असल्याचे ' एचपीईए'चे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी केंद्राला पाठविलेल्या पत्रात नमूत केले आहे.