Onion crop damage Central team directly in the field.
चांदवड : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश पावसामुळे खरिपातील पिकांचे विशेषतः कांदा पिकाचे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे केंद्रीय कृषी उद्यान विभागाचे पथकाने आज थेट चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जात आढावा घेतला. आजपासून दोन दिवस हे पथक जिल्ह्यात ठिकठिकाणी पाहणी करणार आहे. अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे किती नुकसान झाले, किती उत्पादन होईल, याची सविस्तर माहिती पथकाने घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा पिकाचे उत्पादन प्रमाणापेक्षा अधिक होईल, असे सांगताच संबंधित पथकातील अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड, नांदगाव, येवला, निफाड, देवळा, मालेगाव तालुक्यात २८ सप्टेंबरला ढगफुटीसदृश पावसामुळे सगळीकडे हाहाकार उडवला आहे. या अतिवृष्टीत नाशिक जिल्ह्याचे नगदी पीक असलेल्या कांदा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. कांदा किती उत्पादित होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय कृषी उद्यान विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. नवीन पटेल, उपआयुक्त डॉ. रोहित बिष्ट, सहायक संचालक हेमांग भार्गव हे बुधवारी (दि.१) चांदवड तालुक्यातील मालसाणे, पिंपळगाव धावळी गावात थेट बांधावर जाऊन त्यांनी संवाद साधत माहिती घेतली.
शेतकऱ्यांनी पथकाला यंदा भरपूर लागवड झाली असून, उत्पादनदेखील भरघोस निघेल, असे सांगितले. अतिवृष्टीत काही कांदा खराब झाला असला तरी अजून कांद्याची लेट लागवड बाकी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पथक येवल्याला मार्गस्थ झाले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, कृषी उपसंचालक महेश विटेकर, तालुका कृषी अधिकारी नीलेश माळवे, नामदेव पवार आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे किती नुकसान झाले, याची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा किती शिल्लक आहे, किती खराब झाला याची माहिती जाणून घेतली.
नाफेड आणि एनसीसीएफद्वारे कांदा शेतकऱ्यांची सुरू असलेली लूट प्रहारचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांनी पथकातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिली. तसेच बाजार समितीतून थेट कांदा खरेदी करण्याची मागणी निंचाळकर यांनी केली.