लासलगाव(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा – दक्षिणेतील बेंगलोर रोझ कांद्यावरील ४० टक्के शुल्क हटवल्याने लासलगाव येथील खाजगी बाजार समितीत सकाळी कांद्याचे लिलाव सुरू होताच कांद्याच्या बाजार भावात २०० रुपयांची घसरण झाल्याने संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले. या वेळी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धोरणा विरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले होते.
गुजरात राज्यातील सफेद कांदा आणि बेंगलोर गुलाब रोझ कांद्याला परवानगी मात्र महाराष्ट्रतील कांद्याला वेगळा न्याय का असा सवाल शेतकरी प्रतिनिधी शिवसेना(ऊबाठा)गटाचे नेते शिवा सूरासे यांनी या वेळी उपस्थित केला. या वेळी 550 मेट्रिक टन मूल्य व 40 टक्के कांद्यावरील शुल्क हटवण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केली.
केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याचा आरोप या वेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला. येत्या आठ दिवसांत कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क न हटवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.
या वेळी ठाकरे गटाचे नेते शिवा सूरासे, बाळासाहेब जगताप, प्रमोद पाटील, संतोष पानगव्हाणे, भैय्या भंडारी, गोरख संत यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज लासलगाव बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त २००० ते सरासरी १६०० रुपयांचा भाव मिळाला.
हेही वाचा –